Nagpur Vivolence: १७ जानेवारील नागपूरच्या महाल परिसरात झालेल्या हिंसक दंगलीमधील कथित सूत्रधार फहीम खान(Fahim Khan) याच्याविरुद्ध नागपूर महानगरपालिकेने आज निर्णायक कारवाई सुरू केली. नागपूरच्या टेकानाका परिसरातील घर बांधताना फहीम खानने काही भागात अतिक्रमण केले आहे. यासंदर्भात पालिकेने त्याच्या कुटुंबाला या संदर्भात नोटीस बजावली होती. त्याच पार्श्वभूमीवर फहीम खानच्या घरावर आज बुलडोझर चालवण्यात आला.
मात्र नुकतीच फहीम खानच्या घरावरील बुलडोझर कारवाईला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडून स्थगिती देण्यात आली आहे. कारण पालिकेच्या कारवाई विरोधात फहीम खानच्या आईने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर, तत्काळ सुनावणी करताना न्यायालयाने महापालिकेकडून सुरू असलेल्या कारवाईला स्थगिती दिली आहे.
तसेच न्यायालयाने महापालिकेला एका आठवड्यात आपली बाजू मांडण्याचे निर्देशही दिले आहेत. त्यामुळे, फहीम खानसह त्यांच्या कुटुंबाला तुर्तास दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे अतिक्रमण कारवाई विषयी सुप्रीम कोर्टाच्या नव्या गाईडलाईनचे उल्लंघन महापालिकेकडून होत असल्याचा दावा उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेला याचिकेत करण्यात आला होता.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी नागपूर दौऱ्यावर असताना या प्रकरणात दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. तसेच दंगलीत झालेले नुकसान दंगलखोरांकडून वसूल केले जाईल, अशा इशारा दिला होता.