स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त गाण्याबद्दल माफी मागणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. मी जे बोललो ते उपमुख्यमंत्री अजित पवार देखील बोलले होते. मी काहीही वेगळं बोललो नाही, म्हणून मी माफी मागणार नाही. असं स्पष्टीकरण कुणाल कामराने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून दिलं आहे.
सोमवारी कुणाल कामराने आपल्या युट्यूब चॅनेलवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. या व्हिडिओमध्ये त्याने देशातील सध्याच्या राजकीय स्थितीवर भाष्य केलं आहे. यावेळी त्याने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर एक वादग्रस्त गाणं देखील म्हंटल. ज्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं. कुणाल कामराचा व्हिडीओ ज्या स्टुडिओमध्ये शूट झाला होता, त्या स्टुडिओची शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली आहे. शिवाय कुणाल कामराने शिंदेंचा अपमान केल्याबद्दल माफी मागावी अशी मागणी केली. ज्यानंतर कुणाल कामराने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर आपली बाजू मांडत आपण माफी मागणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
My Statement – pic.twitter.com/QZ6NchIcsM
— Kunal Kamra (@kunalkamra88) March 24, 2025
आपल्या पोस्टमध्ये कुणाल कामरा म्हणाला, ‘जिथे तोडफोड झाली ते मनोरंजन स्थळ केवळ एक व्यासपीठ आहे. सर्व प्रकारच्या शोसाठीची ती एक जागा आहे. माझ्या कॉमेडीसाठी कोणतेही ठिकाण जबाबदार नाही. मी काय बोलतो किंवा करतो यावर त्याचे कोणतेही अधिकार किंवा नियंत्रण नाही. तसेच कोणताही राजकीय पक्ष हे करत नाही. एखाद्या कॉमेडियनने केलेल्या वक्तव्यासाठी एखाद्या ठिकाणावर हल्ला करणे म्हणजे बटर चिकन न आवडणाऱ्या व्यक्तीने टोमॅटो घेऊन जाणारा ट्रक पलटवण्यासारखा मूर्खपणा आहे.
माझ्यावर होणाऱ्या कोणत्याही कायदेशीर कारवाईसाठी मी पोलीस आणि न्यायालयांना सहकार्य करण्यास तयार आहे. एखाद्या शक्तिशाली व्यक्तिवर केलेला विनोद सहन करण्याची तुमची असमर्थता असेल तर ते माझ्या अधिकाराचे स्वरूप बदलू शकत नाही. माझ्या माहितीनुसार, आपल्या राजकीय नेत्यांवर व्यंगात्मक विनोद करणं हे कायद्याच्या विरोधात नाही.
पण ज्यांनी तोडफोड केली. त्यांच्याविरुद्ध कायदा न्याय्य आणि समानपणे लागू होईल का? पुढील शोसाठी मी कदाचित एल्फिन्स्टन ब्रिज किंवा मुंबईतील इतर एखादी जागा निवडेल, जी लवकरात लवकर पाडण्याची गरज आहे.’ असं कुणाल कामराने आपल्या पोस्टमध्ये म्हंटल आहे.