पश्चिम बंगाल मधील भाजपचे वरिष्ठ नेते शुभेंदु अधिकारी यांनी सोमवार असा आरोप केला की पश्चिम बंगाल मधील सत्ताधारी तृणमूल कांग्रेसकडून (TMC) मतदार यादीतून बनावट मतदारांची नावे वगळण्याच्या नावाखाली हिंदू आणि हिंदी भाषिक मतदारांची नावे काढली जात आहेत. एका पत्रकार परिषदेला संबोधित करताना अधिकारी यांनी दावा केला की 27 फेब्रुवारीपासून अनेक मतदारांची नावे मतदार यादीतून काढून टाकण्यात आली आहेत.
पश्चिम बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते असलेल्या अधिकारी यांनी म्हंटले आहे की,”मतदार यादीतून हिंदू मतदारांची नावे काढली जात आहेत. मी निवडणूक आयोगाला कृष्णनगरच्या बीडीओला बडतर्फ करण्याची विनंती करतो.” “हिंदू मतदारांना बोलावून ते बांगलादेशी नाहीत हे सिद्ध करण्यास सांगितले जात आहे. फॉर्म 7 सबमिट करणाऱ्यांना पुरावे देण्यास भाग पाडले जात आहे,” असा दावा भाजप नेते अधिकारी यांनी केला आहे. ते म्हणाले की, ज्या भागात पक्षाकडे सर्वाधिक तक्रारी आल्या आहेत. त्या बगदा आणि कृष्णनगरमध्ये भाजप याविरोधात शांततापूर्ण निदर्शने करणार आहे.
भाजपच्या नेत्याने केलेले हे आरोप तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयप्रकाश मजुमदार यांनी बिनबुडाचे ठरवून फेटाळून लावले. हरियाणा आणि इतर राज्यांतील मतदारांचा पश्चिम बंगालच्या मतदार यादीत समावेश करण्यात भाजपचा सहभाग आहे, ही वस्तुस्थिती आहे. आता मतदार यादीतील घोटाळा उघडकीस आल्याने ते लक्ष वळवण्यासाठी आमच्यावर आरोप करत आहेत.असे जयप्रकाश मजुमदार यांनी म्हंटले आहे.