बांगलादेशात पुन्हा एकदा सत्तापालट होण्याचे संकेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशात राजकीय गोंधळ सुरु आहे. येत्या काही दिवसांत देशात बरेच बदल होऊ शकतात असे चिन्ह दिसत आहेत. सध्या बांगलादेशातील सैन्य सतर्क मोडमध्ये असून, सोमवारी सकाळी बांगलादेश सैन्याने तातडीने बैठक घेतली आहे. या बैठकीस वरिष्ठ सैन्य अधिकारी उपस्थित असल्याची माहिती आहे.
बांगलादेशातील अंतरिम सरकार मोहम्मद युनूस यांच्याकडून सैन्य सत्ता काढून घेऊ शकते. असे बोलले जात आहे. त्यासंबंधित सोमवारी बैठक झाली असल्याचं देखील बोललं जात आहे. माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी देश सोडल्यानंतर बांगलादेशातील परिस्थिती अधिकच तणावपूर्ण राहिली आहे.
बांगलादेश सैन्याच्या बैठकीत पाच लेफ्टनंट जनरल, आठ मेजर जनरल, स्वतंत्र ब्रिगेडचे अधिकारी आणि सैन्य मुख्यालयाचे इतर प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
हसीना यांच्यानंतर देशातील सैन्याने मोहम्मद युनूस यांच्या हातात देशाची सत्ता सोपवली होती. मात्र, त्यांनी सत्ता हातात घेतल्यापासून, बांगलादेशातील लोकांमध्ये सरकारवरील असंतोष आणि अविश्वास वाढत आहे. अशा स्थितीत सैन्य राष्ट्रपतींवर आपत्कालीन घोषणा करण्यासाठी दबाव आणू शकते किंवा मोहम्मद युनूस यांच्याकडून सत्ता घेऊ शकते. असे बोलले जात आहे. देशातील सैन्याने राष्ट्रीय एकता सरकार स्थापन करण्याची योजना आखली आहे, जी पूर्णपणे सैन्याच्या देखरेखीखाली असेल.
या सर्व तणावादरम्यान, मोहम्मद युनूस लवकरच चीनला भेट देणार आहेत. त्यांचा हा प्रवास बांगलादेशसाठी खूप महत्वाचा मानला जातो आहे. या भेटीनंतर चीन-बांगलादेश संबंधांमध्ये बदल होऊ शकतात, तसेच या भेटीमुळे देशाच्या राजकारणात नवीन वळण येणार असल्याचं देखील बोललं जात आहे.