Ajay Seth: केंद्र सरकारने अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाचे सचिव अजय सेठ यांना नवे ‘वित्त सचिव’ म्हणून अतिरिक्त जबाबदारी दिली आहे. सोमवारी कार्मिक मंत्रालयाने जारी केलेल्या अधिकृत आदेशाद्वारे ही नियुक्ती निश्चित करण्यात आली आहे.
तुहिन कांता पांडे यांची सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) चे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाल्यानंतर हे पद रिक्त झाले होते. त्यानंतर पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने अजय सेठ यांची नवे वित्त सचिव म्हणून निवड केली. अजय यांना सार्वजनिक वित्त, कर आकारणी, सामाजिक क्षेत्र प्रशासनात प्रदीर्घ अनुभव आहे. या सर्व क्षेत्रात त्यांनी जवळपास 30 वर्षे काम केले आहे.
अजय सेठ हे कर्नाटक केडरचे 1987 बॅचचे IAS अधिकारी आहेत. अजय सेठ यांनी एप्रिल 2021 मध्ये अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाचे सचिव म्हणून पदभार स्वीकारला होता. या महिन्याच्या सुरुवातीला त्यांना महसूल विभागाच्या सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभारही देण्यात आला होता. अजय सेठ यांनी आयआयटी रुरकीमधून मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये बीटेक पूर्ण केले आहे. याशिवाय त्यांनी एटेनियो डी मनिला विद्यापीठातून एमबीएची पदवी मिळवली आहे.
दरम्यान वित्त सचिव वित्त मंत्रालयाच्या सर्व विभागांमध्ये समन्वय साधण्याचे काम करत असतात. हे पद आर्थिक घडामोडी, महसूल, खर्च, गुंतवणूक आणि वित्तीय सेवा या विषयांवर मजबूत पकड असलेल्या व्यक्तीला दिले जाते.