Delhi Budget:दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता(Rekha Gupta) यांनी मंगळवारी दिल्ली सरकारचा अर्थसंकल्प सादर केला. गेल्या तीन दशकात पहिल्यांदाच दिल्लीच्या इतिहासात १ लाख कोटी रुपयांचे बजेट सादर करण्यात आले आहे. आम आदमी पक्षाच्या तुलनेने हे बजेट खूपच जास्त आहे. यामध्ये यमुना स्वच्छ करणे, महिलांची सुरक्षा सुनिश्चित करणे आणि पायाभूत सुविधांच्या समस्यांचे निराकरण करणे यांसारख्या महत्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.
शिक्षण विभागाच्या दुरुस्तीचा भाग म्हणून शिक्षणासाठी 750 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच प्रदूषणावरती काम करण्यासाठी आणि हवेच्या गुणवत्तेच्या संकटाचा सामना करण्यासाठी 300 कोटी रुपयांची घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे आरोग्यसेवा पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी 6,874 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.यामध्ये आयुष्मान आरोग्य मंदिर उपक्रमाचा विस्तार करण्यासाठी निधीचा समावेश आहे तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजना हा देखील महत्वाचा घटक असणार आहे.
तसेच शहरातील सार्वजनिक वाहतूक सुधारण्याच्या योजना आणि संपूर्ण दिल्लीत 50,000 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रमावर अर्थसंकल्पात लक्ष केंद्रित केले गेले आहे. यामुळे महिलांच्या सुरक्षिततेत वाढ होईल असे दिल्ली सरकारकडून सांगण्यात आले आहे. यासाठी १००० कोटींची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.
आजचा अर्थसंकल्प सामान्य नाही. दिल्ली आणि संपूर्ण देशातील जनता सभागृहाच्या माध्यमातून अर्थसंकल्प ऐकत आहे. दिल्लीचे नवे सरकार ऐतिहासिक जनादेश घेऊन आले आहे. या सरकारचा पहिला अर्थसंकल्प कसा असेल याकडे आज संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. गेल्या 10 वर्षांपासून संकटात सापडलेल्या दिल्लीची काळजी घेण्यासाठी हे बजेट पहिले पाऊल आहे, असे म्हणत मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी अर्थसंकल्प सादर करण्यास सुरवात केली होती.