विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली आहे. अनेक दिग्गज नेते महाविकास आघाडीमधून महायुतीमध्ये जात असल्याचं पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीचे नेते महायुतीमधील भाजप आणि शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत. याचा सर्वात मोठा फटका हा ठाकरे गटाला बसत आहे. आताही त्यांचे नेते ठाकरे गटातून बाहेर पडत महायुतीशी संधान साधत आहेत.
आता नुकताच शिवसेना ठाकरे गटाला सांगली जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे, कारण जिल्हाप्रमुखांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. सांगलीतील ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय विभुते, तालुका प्रमुख, युवा सेनेचे पदाधिकारी आणि शेकडो शिवसैनिक आज मुंबईतील रामगिरी बंगल्यावर एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
संजय विभुते यांनी पक्ष बदलण्याची कारणे सांगताना म्हटले आहे की ठाकरे गटात योग्य सन्मान मिळत नाही. त्याचबरोबर पक्ष वाढीकडे वरिष्ठांकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे पक्षाचा राजीनामा देत शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत असल्याची भावना संजय विभूते यांनी व्यक्त केली आहे. तर एकाच वेळी जिल्हा प्रमुखांसह, तालुकाप्रमुख, पदाधिकारी, युवा सेनेचे पदाधिकारी यांच्या शिवसेनेला सोडचिट्टी देण्याच्या निर्णयामुळे जिल्ह्यातील ठाकरे गटाला मोठं खिंडार पडणार आहे.