Weather Update: मागच्या दोन दिवसांमध्ये अवकाळी पावसामुळे राज्यात अनेक शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातच हवामान विभागाने (Meteorological Department)पुढील पाच दिवस तापमान वाढ आणि पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना उष्णता आणि अवकाळी पावसामुळे दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे.
पुढील पाच दिवस कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहील, असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. तसेच पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सांगली, सातारा, कोल्हापुर जिल्ह्यातील काही भागांत विजांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
विशेष म्हणजे सोलापूर, धाराशिव आणि सांगली या तीन जिल्ह्यांमध्ये 29 मार्च रोजी विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पाऊस होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे या भागातील शेती पिकांची काळजी घेण्याचे अवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे. दरम्यान, दक्षिणेकडे कर्नाटक आणि तामिळनाडूच्या दिशेने कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्यामुळे त्याचा परिणाम महाराष्ट्राच्या हवामानावरही दिसून येत आहे.
राज्यात अलीकडेच 3 ते 4 डिग्री तापमानवाढ (Maharashtra Temperature) झाली आहे. मागच्या 24 तासात महाराष्ट्रात 37 ते 40 डिग्री तापमानाची नोंद करण्यात आली आहे. राज्यात पुढच्या ५ दिवसांत 2-3 डिग्री सेल्सियसने तापमान वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. केंद्रीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल आणि मे महिन्यांत उष्णतेची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे. तसेच सध्या आपण मान्सूनपूर्व उष्णतेच्या प्राथमिक टप्प्यात आहोत, असे देखील केंद्रीय हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.