स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानानंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. शिंदे गटाचे समर्थक कुणाल कामरावर कारवाईची मागणी करत आहेत. अशातच आता त्याच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. मुंबई पोलिसांनी कुणाल कामराला चौकशीसाठी समन्स बजावले होते. पण तो चौकशीसाठी आला नाही.
मात्र, आता कुणाल कामराने पोलिसांच्या समन्सला उत्तर दिले आहे. कुणाल कामराने पोलिसांसमोर हजर होण्यासाठी एका आठवड्याचा वेळ मागितला आहे.
सोमवारी मुंबई पोलिसांनी कुणाल कामराविरोधात गुन्हा दाखल केला. खार पोलिस याप्रकरणाचा तपास करत आहेत. एकनाथ शिंदेंविरोधात अपमानास्पद टिप्पणी केल्याप्रकरणी कुणाल कामराला मंगळवारी पोलिसांनी समन्स बजावले. हे समन्स कुणालला त्याच्या व्हॉट्सअॅप नंबरवर पाठवण्यात आले आहे. पोलिसांनी पाठवलेल्या समन्सला उत्तर देताना कुणालने चौकशीसाठी हजर राहण्यासाठी ७ दिवसांचा वेळ मागितला आहे.
सोमवारी कुणाल कामराने आपल्या युट्यूब चॅनेलवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. या व्हिडिओमध्ये त्याने देशातील सध्याच्या राजकीय स्थितीवर भाष्य केलं आहे. यावेळी त्याने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर एक वादग्रस्त गाणं देखील म्हंटल. ज्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं. कुणाल कामराचा व्हिडीओ ज्या स्टुडिओमध्ये शूट झाला होता, त्या स्टुडिओची शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. शिवाय कुणाल कामराने शिंदेंचा अपमान केल्याबद्दल माफी मागावी अशी मागणी केली. मात्र, कुणाल कामराने एकनाथ शिंदे यांची माफी मागण्यास नकार दिला.
दरम्यान, कुणाल कामरावर सध्या महायुतीच्या नेत्यांकडून जोरदार टीका होत आहे तसेच सर्वजण कारवाईची मागणी करत आहेत. शिंदेसेनेकडून कुणाल कामराविरोधात दोन तक्ररी दाखल करण्यात आल्या होत्या. यानंतर त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आता पोलिस त्याच्याविरोधात पुढे काय कारवाई करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.