Santosh Deshmukh Case: बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सुनावणीला २० मार्चपासून सुरवात झाली आहे. आज (२६ मार्च) या प्रकरणातील दुसरी सुनावणी कोर्टात पार पडली. सुनावणीदरम्यान विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम आणि आरोपीचे वकिल विकास खाडे यांनी युक्तीवाद केला. यावेळी आरोपींना व्हीसीद्वारे हजर करण्यात आले होते.
उज्वल निकम यांनी आज युक्तिवाद करताना हत्येचा घटनाक्रम सांगितला. 8 डिसेंबर रोजी विष्णू चाटे सुदर्शन घुले व अन्य एक गोपनीय साक्षीदार असे सर्वजण केज मांजरसुंबा रोडवर नांदूर फाटा येथे तिरंगा हॉटेल वर रात्री नऊ वाजेच्या सुमारास एकत्रित भेटले. त्यांची बैठक झाली. यावेळी विष्णू चाटे संतापला होता. यावेळी घुले याने चाटेला सांगितले होते की, मी खंडणीच्या ठिकाणी गेलो होतो. पण संतोष देशमुख आडवे आले. यावेळी विष्णू चाटे याने वाल्मीक कराडने त्याला फोनवर सांगितलेला मेसेज घुलेला सांगितला. तो मेसेज म्हणजे कराडने म्हटले होते की, आडवे आले तर कायमचा धडा शिकवा. उज्वल निकम यांनी या संपूर्ण प्रकरणाचे टॉवर लोकेशन व इतर पुरावे सादर केले आहेत.
या बैठकीनंतर 9 डिसेंबर 2024 रोजी दुपारी साडेतीन वाजता संतोष देशमुख याचे केस बीड रोडवर उमरी फाटा टोल नाका येथून अपहरण करून क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. आरोपी यावेळी हसून आनंद घेत होते. कारण आमचे काही होऊ शकत नाही, आमच्यावर यापूर्वीही याप्रकारच्या केसेस आहेत अशा आरोपींच्या धारणा होत्या, असेही उज्वल निकम यांनी आपल्या युक्तिवादात म्हटले आहे. अशीच अनेक महत्वपूर्ण माहिती देत तब्बल 32 मिनिटे उज्वल निकम यांनी युक्तिवाद केला.
वाल्मीक कराडचे वकील विकास खाडे यांनी युक्तिवाद करताना उज्वल निकम यांनी सांगितलेल्या सर्व घटनांचे सीडीआर आणि लोकेशन पुरावे मागितले. त्यानंतर उज्वल निकमांनी ते दिलेही. मात्र कागदपत्र मिळाल्यानंतर कागदपत्रांच्या अभ्यासासाठी वेळ द्यावा, अशी मागणी कराडच्या वकिलाने केली. ही मागणी लक्षात घेता न्यायाधीशांनी पुढील सुनावणीची तारीख 10 एप्रिल दिली आहे. त्यामुळे आता संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी १० एप्रिलवर गेली आहे.