ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आणि स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा यांच्यावर हक्कभंग आणावा अशी भूमिका भाजपा गटनेते प्रवीण दरेकर यांनी घेतली आहे.
स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानानंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. ज्याचे पडसाद सभागृहात देखील दिसून आले आहेत.
कुणाल कामराने एकनाथ शिंदेंबाबत केलेल्या वक्तव्यावर कुणालने माफी मागावी अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेच्या नेत्यांनी घेतली आहे. पण कुणालने माफी मागण्यास नकार दिला आहे. तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी कुणाल कामराची बाजू घेतली आहे. अशातच सुषमा अंधारे आणि कुणाल कामरा यांच्याविरोधात हक्कभंग आणावा, असा प्रस्ताव भाजपा गटनेते प्रवीण दरेकर यांनी विधान परिषदेत मांडला आहे.
प्रवीण दरेकर म्हणाले की, ‘कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अपमान केला आहे. कुणाल कामराने जी कविता केली आहे. तीच कविता पुन्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी बोलून दाखवली. त्यानंतर त्यांनी अजून एक कविता केली. त्या कवितेच्या माध्यमातून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर बोलताना उपमुख्यमंत्र्यांच्या बाबत चुकीची भाषा वापरली. त्यांनी कवितेच्या माध्यमातून दोन्ही सभागृहाचा अवमान आणि अपमान केला आहे. तर कुणाल कामराने एकनाथ शिंदे यांच्याबाबत खालच्या पातळीवरील टीका केली. त्यामुळे या दोघांविरोधात मी सभागृहात हक्कभंग मांडत आहे, असं प्रवीण दरेकर यांनी स्पष्ट केलं आहे.