सज्जन जिंदल यांच्या नेतृत्वाखालील JSW स्टील कंपनी जगातील सर्वात मौल्यवान स्टील कंपनी बनली आहे. मंगळवारी या कंपनीच्या शेअरची किंमत 1,074.15 रुपयांवर पोहोचली आहे. यासह कंपनीचे मार्केट कॅप $30 अब्ज पेक्षा जास्त झाले आहे. गेल्या एका महिन्यात शेअर सुमारे 11 टक्के आणि मागील एका आठवड्यात 4 टक्के पेक्षा जास्त शेअर वाढला आहे.
JSW स्टीलने अमेरिकेच्या Nucor Corp ला मागे टाकत जगातील सर्वात मौल्यवान स्टील कंपनी होण्याचा मान मिळवला आहे. Nucor Corp चे मार्केट कॅप $29.92 अब्ज आहे. तर युरोपातील आर्सेलर मित्तल, जपानची निप्पॉन स्टील कॉर्प आणि चीनची बाओशान आयर्न या मोठ्या स्टील कंपन्यांचे मार्केट कॅप $21 अब्ज ते $27 बिलियन दरम्यान आहे.
जेएसडब्ल्यू स्टीलचे मूल्य टाटा स्टील, जिंदाल स्टील आणि पॉवर आणि स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया (सेल) सारख्या इतर भारतीय कंपन्यांपेक्षा जास्त आहे. टाटा स्टील ही भारतातील दुसरी आणि जगातील पाचवी सर्वात मौल्यवान स्टील कंपनी आहे, तिचे मार्केट कॅप अंदाजे $23.09 अब्ज आहे. जिंदाल स्टीलचे मार्केट कॅप $10.81 बिलियन आहे तर सरकारी मालकीच्या SAIL चे मार्केट कॅप $5.5 बिलियन आहे. गेल्या एका आठवड्यात टाटा स्टील आणि सेलचे शेअर्स 1 ते 5 टक्के वाढले आहेत तर जिंदाल स्टील आणि पॉवरचे शेअर्स घसरले आहेत.
सज्जन जिंदल यांचा मुलगा पार्थ जिंदल यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवर कंपनीच्या कामगिरीबद्दल आभार व्यक्त केले आहे. त्याने सोशल मीडियावर लिहिले की, ”हे सांगताना मला खूप गर्व वाटतोय की, JSW स्टील बाजार भांडवलाच्या बाबतीत जगातील सर्वात मोठी स्टील कंपनी बनली आहे.” आपल्या पोस्टमध्ये त्यांनी वडील साजन जिंदाल आणि आई संगिता जिंदालसह संपूर्ण JSW ग्रुपचे आभार मानले आहेत.