सध्या ओला-उबेरमुळे वाहतूक अगदी सहज सोपी झाली आहे. गेल्या काही वर्षात ओला-उबेर सारख्या खाजगी वाहतूक कंपन्यांनी वाहतूक क्षेत्रात चांगला जम बसवला आहे. पण आता या कंपन्यांसमोर सरकार मोठे आव्हान उभे करणार असल्याचं चित्र आहे. नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एक घोषणा केली आहे. ज्यामुळे कॅब कंपन्यांची चिंता वाढली आहे.
भारत सरकार लवकरच ओला-उबेर सारखा सरकारी टॅक्सी प्लॅटफॉर्म उभा करणार असल्याचं अमित शाह यांनी आपल्या लोकसभेतील भाषणादरम्यान सांगितलं आहे.
अमित शाह म्हणाले की, ‘सरकार येणाऱ्या काही महिन्यांमध्ये ओला-उबेरसारखा एक सहकारी टॅक्सी प्लॅटफॉर्म सुरू करणार आहे. या माध्यमातून दुचाकी, रिक्षा आणि चारचाकींचीही नोंदणी करण्यात येईल. तसेच यामधून होणारा नफा हा कुठल्याही भांडवलदाराकडे नाही तर थेट ड्रायव्हरच्या खात्यांमध्ये जमा होईल.’ असं त्यांनी आपल्या भाषणादरम्यान, सांगितलं आहे.
देशात सध्या कोणत्याही प्रकराची सहकारी टॅक्सी सेवा उपलब्ध नाही. अशातच जर येत्या काळात सहकारी टॅक्सी सेवा सुरू झाली तर ओला-उबेरसारख्या खाजगी कॅब कंपन्यांसमोर या क्षेत्रात टिकून राहण्यासाठी मोठं अव्हान असेल.
कारण सध्या खासगी कंपन्या प्रत्येक प्रवासी राईड मागे ठराविक रक्कम घेतात. ज्यामुळे कॅब चालकाला जास्त फायदा होत नाही. अशास्थितीत जर सरकारी कंपनी या क्षेत्रात उतरली तर खासगी कंपन्यांचं या क्षेत्रात राहणं थोडं अवघड होऊ शकत.