Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तेवर येताच विविध निर्णयांचा सपाटा लावल्याने अनेक देशांना धडकी भरली आहे. त्यातच आता त्यांनी पुन्हा एकदा संपूर्ण जगाचे टेंशन वाढवणारी घोषणा केली आहे. आता अमेरिकेत आयात केल्या जाणाऱ्या विदेशी कार व कारसाठीच्या साहित्यासाठी २५ टक्के कर लागू होणार आहे. याबाबतची घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी २६ मार्च रोजी केली.
जगभरातील विविध कंपन्यांच्या पूर्ण तयार केलेल्या कार अमेरिकेत आयात केल्या जातात. तर विविध कंपन्यांच्या कारचे वेगवेगळे पार्ट अमेरिकेत आयात होतात व तेथील प्लांटमध्ये ते जोडले जातात. आता ट्रम्प यांच्या या निर्णयाचा या दोन्ही प्रकारच्या व्यावसायावर परिणाम होण्याची शक्यता आहे. हा नवीन नियम १ एप्रिलपासून लागू होणार आहे.
ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे भारतीय कंपनी टाटा मोटर्सचे शेअर्स सुमारे ६ टक्क्यांनी घसरले आहेत. तसेच अमेरिकन ऑटोमोबाईल कंपनी जनरल मोटर्सचे शेअर्स बुधवारी ३ टक्क्यांनी घसरल्याचे पाहायला मिळाले. विशेष म्हणजे जीप आणि क्रिस्लरचे मालक स्टेलांटिसचे शेअर्स देखील सुमारे 3.6% घसरल्याचे दिसत आहे.
दरम्यान, अमेरिकेतील ऑटो व्यवसायाला चालना देऊन उत्पादन वाढवण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे ट्रम्प यांनी स्पष्टे केले आहे. ट्रम्प सरकारने गृहित धरले आहे की, या निर्मयामुळे वार्षिक 100 डाॅलर अब्ज महसूल वाढेल. मात्र कॅनडासह काही देशांनी ट्रम्प यांच्या या निर्णयावर टीका केली आहे.