Bhushansiha Raje Holkar : माजी खासदार संभाजी राजे यांनी रायगड किल्ल्यावरुन वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्याची मागणी केल्यानंतर राज्यात एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. नुकतेच धनगर समाजाचे नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake)यांनी संभाजी राजेंच्या या निर्णयाला विरोध दर्शविला आहे. अशातच आता अहिल्याबाई होळकर यांचे वंशज भूषणसिंहराजे होळकर यांनी या मुद्द्यावर आपली भूमिका मांडली आहे.
भूषणसिंहराजे होळकर म्हणाले की, लोकांच्या प्रश्नापेक्षा या विषयांवर भर दिला जात आहे. यातून समाजातून तेढ निर्माण होत असून हे सगळे चिंताजनक आहे. औरंगजेब कबरीच्या विषयानंतर आता वाघ्या कुत्र्याचा विषय समोर आला आहे. ऐतिहासिक विषय हे जातीविषयक विषय नसतात, तत्कालीन परिस्थितीनुसार असतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी कर्तृत्वाच्या जोरावर माणसे निवडली होती. जातीच्या जोरावर माणसे निवडली नाहीत, असेही होळकर म्हणाले.
या मुद्द्याबाबत सरकार आणि भारतीय पुरातत्व विभागने पुढाकार घ्यावा आणि त्यांनी इतिहास अभ्यासक आणि बाकी काहींना सोबत घेऊन समिती नेमावी. या समितीमध्ये राजकीय व्यक्तींचा समावेश करू नये. दोन्ही बाजू समजून घ्याव्या आणि तोडगा काढावा असे मत भूषणसिंहराजे होळकर यांनी व्यक्त केले आहे. या विषयावर बोलायची इच्छा नव्हती. मात्र, सामाजिक तेढ निर्माण होऊ नये म्हणून बोलत आहे, असेही भूषणसिंहराजे होळकर म्हणाले. वाघ्या समाधीवर बोलणाऱ्या दोन्ही गटांसाठी हा भावनेचा विषय झाला आहे.
वाघ्या कुत्र्याचे अस्तित्व होते की नव्हते याच्यावर मी बोलणार नाही. इतिहासाच्या पुराव्यांवरून वाघ्या होता की नव्हता हे ठरवता येईल, असे स्पष्ट मत भूषणसिंहराजे होळकर यांनी व्यक्त केले आहे. एकंदरित वाघ्या कुत्र्याच्या अस्तित्वावर भूषणसिंहराजे होळकर यांनी वैयक्तिक मत मांडले नाही. दरम्यान, धनगर समाजाचे नेते लक्ष्मण हाके( (Laxman Hake)यांनी वाघ्या कुत्र्याचे स्मारक हटवण्यास विरोध दर्शविला आहे. तसेच रायगड विकास प्राधिकरणावरुन संभाजी राजेंची हकलपट्टी व्हावी, अशी मागणी देखील हाके यांनी केली आहे.