जर तुमच्याकडे रेल्वेचे वेटिंग तिकीट असेल आणि तरीही तुम्ही रेल्वेचा प्रवास करत असाल तर सावधान. कारण जर तुमच्याकडे वेटिंग तिकीट असेल तर तुम्हाला प्लॅटफॉर्मवर देखील प्रवेश मिळणार नाही. नुकतच रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी यासंबंधित मोठा निर्णय घेतला आहे.
चेंगराचेंगरी आणि गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी, वेटिंग तिकीट असलेल्या प्रवाशांना रेल्वे स्थानक आणि प्लॅटफॉर्मवर प्रवेश दिला जाणार नाही, असं अश्विनी वैष्णव यांनी जाहीर केल आहे.
रेल्वे स्थानकांवर गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचं रेल्वेमंत्र्यांनी सांगितलं आहे. अलीकडेच मुंबई आणि नवी दिल्ली येथे चेंगराचेंगरीच्या घटना घडल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
प्रमाणापेक्षा जास्त तिकीट विक्रीमुळे ही गर्दी वाढत असून, यामुळे चेंगराचेंगरीच्या घटना वाढल्या आहेत. या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी रेल्वेने आता हे पाऊल उचलले आहे.
आता फक्त ट्रेनमधील उपलब्ध जागांनुसारच तिकीटे विकली जातील. त्यामुळे वेटिंग तिकीट असलेल्या प्रवाशांना प्लॅटफॉर्मवर देखील प्रवेश नाकारला जाईल, असे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी संसदेत सांगितले आहे.
नवीन नियमांनुसार आता कन्मर्फ तिकिट असलेल्या प्रवाशांनाच प्लॅटफॉर्मवर प्रवेश मिळेल. व वेटिंग लिस्ट तिकीट किंवा तिकीट नसलेल्या प्रवाशांना स्थानकाबाहेरच थांबावे लागेल.