तामिळनाडूमध्ये मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांच्या द्रमुक सरकारला भाषा धोरणांबद्दलच्या विरोधाभासी दृष्टिकोनाबद्दल टीका सहन करावी लागत आहे. २०२६ ची विधानसभा निवडणुक समोर ठेवून मुख्यमंत्री स्टालिन यांनी हिंदी भाषेला तीव्र विरोध केला आहे. त्यांनी केंद्र सरकारच्या त्रिभाषिक सूत्राला नकार दिला आहे, तसेच हिंदी भाषेने प्रादेशिक बोलीभाषा गिळंकृत केल्या अशी वादग्रस्त विधाने केली आहेत. स्टॅलिन यांनी सरकारी शाळांमध्ये हिंदी शिकवण्यासही बंदी घातली आहे, तर द्रमुक खासदारांनी भारतातील सर्वात जुनी भाषा असलेल्या संस्कृतवर अपमानजनक विधाने केली आहेत.
वस्तूतः द्रमुक सरकारची भूमिका विसंगत असल्याचे दिसून येत आहे. कारण ते द्रमुक नेत्यांशी संलग्न असलेल्या खाजगी शाळांमध्ये हिंदी शिकवण्याची परवानगी देतात. आणि या संस्थांना पाठिंबा सुद्धा देतात. या ही पलिकडे जाऊन स्टालिन सरकारने उर्दू भाषेला कवटाळले आहे. खुद्ध एम.के स्टॅलिन यांचा मुलगा आणि उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी DMK पक्षाने आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीत त्या संदर्भात मोठे खुलास केले आहेत.
तामिळनाडूच्या द्रमुक सरकारने मुस्लिम समुदायाच्या कल्याणावर सातत्याने लक्ष केंद्रित केले आहे, त्यांच्यासाठी विविध योजना राबवल्या आहेत. त्यासाठी त्यांनी तमिळनाडू उर्दू अकादमीची स्थापना केली आणि तिच्या कामकाजासाठी भरीव निधीची तरतूद केली. याव्यतिरिक्त, राज्यातील २७५ हून अधिक उर्दू शाळांना अनुदान दिले आहे. जेव्हा केंद्र सरकारने तिहेरी तलाकबाबत कायदे आणि वक्फ बोर्डात सुधारणा आणल्या, तेव्हा द्रमुक खासदारांनी संसदेत तीव्र विरोध दर्शविला. मुस्लिमांसाठी एवढी कामे केल्यानंतर आता तामिळनाडूतल्या मुस्लिमांनी DMK सरकारलाच पाठिंबा दिला पाहिजे, असे उदयनिधी यांनी म्हटले आहे.
२०२३ मध्ये मुस्लिम विद्यार्थ्यांना दुसरी भाषा म्हणून तमिळ शिकण्याची परवानगी देण्याच्या द्रमुकच्या या पक्षपाती निर्णयावर अण्णा द्रमुक आणि भाजपसारख्या विरोधी पक्षांनी टीका केली आहे, ज्यांचा असा युक्तिवाद आहे की हे एक प्रकारचे तुष्टीकरण आहे. मात्र विरोध असूनही, द्रमुक सरकार आपल्या निर्णयावर ठाम राहिले, ज्याला काही लोक मुस्लिम समुदायाला खुश करण्याचा प्रयत्न मानतात. कारण या निर्णयाचे उद्दिष्टच मुळात तामिळनाडूमधील मुस्लिम समुदायाचा पाठिंबा मिळवणे आहे. त्यामुळे द्रमुक हा मुस्लिमांचे लांगुलचालन करणारा आणि कायम वादग्रस्त विधाने करणारा पक्ष आहे, अशी प्रतिमा सर्वसामान्यांच्या मनात तयार झाली आहे.