कर्नाटकातील बेळगावमध्ये, स्थानिक काँग्रेस नेते मुझम्मिल अत्तार यांना सोशल मीडियावर प्रक्षोभक मजकूर पोस्ट केल्याबद्दल कायदेशीर कारवाईचा सामना करावा लागत आहे. अत्तार यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर औरंगजेब आणि टिपू सुलतान यांचे फोटो शेअर केला आणि त्यासोबत “बाप है तुम्हारा भुलना मत” असे भडकाऊ कॅप्शन लिहिले. त्यांची ही पोस्टअल्पावधीतच सगळीकडे वायरल झाल्याने यावरून वाद निर्माण झाला. तसेच त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्यात यावी अशी मागणी होऊ लागली.
जनतेच्या तक्रारीवरून अखेर मुझम्मिल अत्तारवर बेळगाव मार्केट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. वाढत्या परिस्थितीला प्रतिसाद म्हणून, अत्तार यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्रोफाइलवरून वादग्रस्त पोस्ट त्वरित हटवली.सध्या पोलीस या घटनेची अधिक चौकशी करत असून आरोपी विरुद्ध पुढील कारवाई सुरु आहे.
दरम्यान, छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर बेतलेला ‘छावा’ चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यानंतर औरंगजेबाच्या नावाचा वाद आणखी वाढला आहे. तथापि, यापूर्वीही औरंगजेबाच्या नावावरून वाद झाला होता. पण ‘छावा’ चित्रपटात औरंगजेबाची क्रूरता पाहिल्यानंतर देशभरातील लोकांमध्ये औरंगजेबाबद्दल संताप आणखी वाढला. त्यातच औरंगजेबाची कबर हटवावी यासाठी मागणी होऊ लागली.नागपुरात यावरून अलीकडेच हिंसाचार घडला होता. ज्यामध्ये पोलिसांनी अनेकांच्या मुसक्या आवळल्या होत्या.