Prashant Koratkar:छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविरोधात गरळ ओकणारा आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant)यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला २४ मार्च रोजी तेलंगणातून अटक करण्यात आली होती. अटकेनंतर त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.
अटकेनंतर सुनावण्यात आलेली कोरटकरची तीन दिवसांची पोलिस कोठडी आज संपल्याने त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. परंतु न्यायालयाने कोरटकरला दणका देत त्याला आणखी दोन दिवसांची कोठडी सुनावली आहे. सरकारी वकिलांनी पाच दिवसाच्या कोठडीची मागणी केली होती. परंतु न्यायालयाने दोन दिवसांची कोठडी सुनावली आहे.
विशेष म्हणजे सुनावणीनंतर एका वकिलाने कोरटकरवर हल्ला केल्याची घटना घडली. कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयातून बाहेर पडताना कोरटकरला एका वकिलाने मारहाण करण्याचा प्रयत्न केला. पोलीस बंदोबस्तात कोरटकरला नेत असताना मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून पोलिसांनी वेळीच वकिलाला आवरल्याने मोठा अनर्थ टळला. अमित भोसले असे हल्ला करणाऱ्या वकिलाचे नाव असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, प्रशांत कोरटकरने 24 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री १२ च्या आसपास इंद्रजित सावंत यांना फोन करून जीवे मारण्याची धमकी दिली होती. तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याबद्दलही वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर राज्यात खळबळ उडाली होती.