उद्धव ठाकरेंचा आणि अभ्यासाचा संबंध नाही. ते ‘ढ’ विद्यार्थी आहेत, असा खोचक टोला मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी लगावला आहे. कनकवली येथील प्रहार भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या पत्रकार परिषदेदरम्यान त्यांनी विविध विषयांवर माध्यमांशी संवाद साधला. आणि उद्धव ठाकरेंवर निशाणाही साधला.
गुढीपाडाव्याच्या आधी जनतेला एक गोड बातमी देण्यासाठी आज पत्रकार परिषद आहे. जिल्ह्यातील प्रशासनात आर्थिक शिस्त आणणार असा जिल्ह्यातील जनतेला शब्द दिला होता. त्यानुसार 31 मार्च पर्यत मागील शिल्लक 250 कोटी निधी खर्च करुन नवीन निधीच नियोजन केलं जाईल असं मी अश्वासन दिले होते. सोमवारी 31 मार्च आहे, 98 टक्के निधी आज पर्यंत खर्च झालाय” अशी माहिती मंत्री नितेश राणे यांनी दिली आहे.राज्य जिल्हा नियोजन निधी खर्चात आपला जिल्हा 32 वरून राज्यात पहिल्या क्रमांकावर आलाय. यासाठी जिल्हा प्रशासन व अधिकाऱ्यांचे विशेष अभिनंदन व आभार. जिल्ह्यात आर्थिक शिस्त आणण्यासाठी टाकलेलं हे पाहिलं पाऊल आहे” असं नितेश राणे म्हणाले आहेत.
पुढे त्यांनी टिका करणाऱ्या उद्धव ठाकरेंवर तोफ डागली ते म्हणाले, की “उद्धव ठाकरेंचा आणि अभ्यासाचा संबंध येत नाही. त्यांना मूळ अर्थसंकल्प कळत नाही. नियम आणि कायदेही कळत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाप्रमाणे चालणारा आपला देश आहे. जो कायदा संसदेला लागू होतो तोच कायदा राज्य सरकारलाही लागू होतो. संसदेत योग्य संख्याबळ नसल्याने विरोधी पक्षनेता नव्हता. हाच नियम प्रत्येक राज्यालाही लागू होतो. परंतू, उद्धव ठाकरेंना याची माहिती घ्यावीशी वाटली नसेल. त्यामुळे अभ्यास आणि उद्धव ठाकरे यांचा काडीमात्र संबंध नाही. ते ‘ढ’ विद्यार्थी आहेत.”
“आम्हाला उद्धव ठाकरेंना हिंदुत्वाचे सर्टिफिकेट देण्याची गरज नाही. त्यांचे राजकीय धर्मांतर झाले आहे. आमच्या स्वागतासाठी लोक अल्लाहू अकबरचे नारे देत नाहीत तर आजही लोक जय श्री राम आणि वंदे मातरम असेच नारे देतात. त्यामुळे उद्धव ठाकरेंसारख्या मुल्ला मौलवींसमोर झुकणाऱ्या लोकांनी आम्हाला हिंदुत्वाचे सर्टिफिकेट देऊ नये. त्यांनी दाढी कुरवाळत बसावे,” अशी टीका त्यांनी केली.