TMKOC:तारक मेहता का उल्टा चष्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही हिंदी मालिका गेली १७ वर्षे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. अनेक वर्षे या मालिकेतील दया (Daya)आणि जेठा(Jethalal) या जोडीने प्रेक्षकांना खळखळून हसवले. परंतु २०१७ मध्ये दयाबेनची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा वकानीने मातृत्वासाठी ब्रेक घेतला होता. त्यानंतर ती मालिकेत परतली नाही. मात्र तिचे चाहते आजही दयाबेन मालिकेत परत येईल याची वाट पाहत आहे. मात्र याबाबत नुकतीच महत्वाची अपडेट समोर आली आहे.
मालिकेचे निर्माते असितकुमार मोदी (Asit Kumar Modi) यांनी एका मुलाखतीत बोलताना म्हटले आहे की, अखेर नवीन दयाबेनसाठी ऑडिशन्स घेऊन एका अभिनेत्रीचे नाव फायनल करण्यात आले आहे. तिचे नाव मात्र असित मोदींनी गुपित ठेवले आहे. मात्र संबंधित अभिनेत्रीबरोबर मॉक शूटिंगही सुरू झाले आहे. उपलब्ध माहितीनुसार, गेल्या आठवड्यापासून हे मॉक शूटिंग सुरु असून ती अभिनेत्री असित मोदींना खूपच भावली आहे. त्यामुळे लवकरच मालिकेत नवीन दयाबेन दिसणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मालिकेत नवीन दयाबेनला पाहण्यास प्रेक्षक उत्सुक असले तरी दिशा वकानी परत येणार नाही हे ऐकून दिशाचे चाहते नाराज आहेत. दिशा वकानी आणि असित मोदींमध्ये काहीतरी बनिसल्याने दिशा परत येत नाही, अशा चर्चा देखील रंगत असतात. तर काही वेळा दिशाने तिच्या वैयक्तिक जीवनाला वेळ देण्यासाठी मालिकेत परत येण्यास नकार दिला असे देखील म्हटले जाते.
दरम्यान, दिशासह मालिकेतील अनेक लोकप्रिय कलाकारांनी मालिकेला रामराम ठोकला. टप्पू साकारणारा राज अनाडकत, गोलीची भूमिका करणारा कुश शाह, तारक मेहता साकारणारे शैलेश लोढा, सोनू साकारणारी झील मेहता हे कलाकार आता मालिकेत दिसत नाहीत.