Nitin Gadkari: पुणे ते छत्रपती संभाजीनगर प्रवास आता अधिक वेगवान होणार आहे. सध्या 6 ते 7 तासांत होणारा प्रवास लवकरच अवघ्या 2 तासांत होईल, अशी माहिती केंद्रीय महामार्ग व रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. नितीन गडकरी यांनी आज (२९ मार्च) संसदेत याबाबतची घोषणा केली आहे.
पुणे आणि छत्रपती संभाजीनगर या दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणारा हा नवीन महामार्ग तब्बल १५ हजार कोटी रुपये खर्चून उभारला जाणार आहे. या प्रकल्पामुळे सध्याचा ७ तासांचा प्रवास अवघ्या २ तासांवर येणार असल्याने पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या विकासाला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. या महामार्गामुळे केवळ प्रवासाचा वेळच वाचणार नाही, तर इंधनाचीही बचत होईल आणि दोन्ही औद्योगिक शहरांमधील कनेक्टिव्हिटी अधिक सुधारेल, असे मत नितिन गडकरींनी व्यक्त केले आहे. दरम्यान, लोकसभेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांनी विचारलेल्या पुरवणी प्रश्नाचे उत्तर देताना गडकरी यांनी ही माहिती दिली आहे.
या घोषणेसोबतच नितीन गडकरी यांनी देशातील रस्ते विकासाच्या व्यापक योजनांचीही माहिती दिली. देशभरातील महामार्गांवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी दोन वर्षांमध्ये देशातील सुमारे २५ हजार किलोमीटर लांबीचे दुपदरी रस्ते चौपदरी करण्यात येणार आहेत. तसेच, सध्याचे चौपदरी रस्ते सहापदरी करण्याची योजना असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यामुळे देशभरातील रस्त्यांचे जाळे अधिक सक्षम होईल.
गडकरी यांनी महाराष्ट्रातील रस्ते अपघातांच्या वाढत्या संख्येवरही चिंता व्यक्त केली आणि अपघात नियंत्रणासाठी सरकार करत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. अपघातांच्या सर्व कारणांवर मात करण्यासाठी आणि अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी महामार्ग मंत्रालय विविध उपाययोजना राबवत असल्याचेही त्यांनी सभागृहाला सांगितले आहे.