पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नागपूर दौऱ्यावर आहेत. नागपूर दौऱ्याची सुरुवात करताना प्रथम पंतप्रधान मोदींनी रेशिमबाग येथील संघ स्मृती मंदिर परिसराला भेट दिली आणि आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार तसेच द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीस्थळाला अभिवादन केले.
त्यानंतर त्यांनी माधव नेत्रालय प्रीमियम सेंटरची पायाभरणी केली. यावेळी पंतप्रधानांनी संवाद देखील साधला. आपल्या भाषणादरम्यान पंतप्रधान मोदींनी सांगितले की, ‘जिथे सेवा असते तिथे स्वयंसेवक असतात. सेवामूल्ये आणि साधना स्वयंसेवकांना प्रेरणा देतात. गुलामगिरीच्या काळात संघ संस्थापकांनी नवीन कल्पना दिल्या. आरएसएस हा भारताच्या अमर संस्कृतीचा शाश्वत वृक्ष आहे. हे अक्षयवट भारतीय चेतनेला ऊर्जा देत आहे.
पुढे मोदी म्हणाले, ‘राष्ट्रीय स्वंयसेवक संघ भारताच्या राष्ट्रीय संस्कृतीचा कधीही न मिटणारा अक्षय वट आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही असाच एक अविरत चालणारा यज्ञ आहे. जो बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करत आहे. बाह्यदृष्टी म्हणजे माधव नेत्रालय सारखे उपक्रम आहे. तर आंतरिक दृष्टी म्हणजे संघ सेवा कार्याचा पर्याय बनला आहे. हे सेवा संस्कार, ही साधना प्रत्येक स्वयंसेवकाचा प्राणवायू आहे. प्रत्येक स्वयंसेवक पिढी दर पिढी याच्यातून प्रेरित होत आहे. त्याला निरंतर गतिमान ठेवते. त्यामुळे स्वंयसेवक कधीही थकत नाही, थांबत नाही. ‘ असंही यावेळी मोदींनी म्हंटल आहे.