हिंदू नववर्षाच्या शुभारंभास गुढीपाडवा हा सण मुंबईसह राज्यभरात मोठ्या उत्साहात पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यात आला. ढोल ताशांचा गजर, झांज, लेझीम, आणि पारंपारिक वेष परिधान करुन आनंदात लोकांनी नववर्षाचे स्वागत केले. तसेच मुंबई आणि महाराष्ट्रात मिरवणुका आणि शोभायात्रांद्वारे एकतेचा संदेश देणाऱ्या गुढ्या दारोदारी उभारण्यात आल्या.
या दरम्यान काढण्यात आलेल्या शोभायात्रांमध्ये अनेक महिलांनी नऊवारी साडी, पैठणी साडी, पारंपारिक दागिन्यांचा साज, डोक्यावर फेटा आणि पायात कोल्हापूर चप्पल घालून सहभाग घेतला. पुणेरी ढोल ताशा पथकं, महिलांचे विशेष झांज पथकं, विविध शोभायात्रेतील रथांचा सहभाग होता.
मुंबईतील गिरगावच्या फडके गणेश मंदिरापासून शोभायात्रेला सुरुवात झाली. येथे २२ फुटांची गुढी उभारण्यात आली. दरवर्षी प्रमाणे, यंदाही शोभायात्रेतील महिलांची बुलेटस्वारी सर्वांचे लक्ष वेधून घेणारी ठरली. पारंपारिक मराठमोळ्या पेहरावातील महिलांनी बुलेट आणि विविध दुचाकी घेऊन शोभायात्रेत उत्साहाने सहभाग घेतला. लहानग्यांनीही खास वेशभूषा करून उत्स्फूर्तपणे या शोभायात्रेत सहभाग नोंदवला.
हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी रत्नागिरीत आज गुढीपाडव्याच्या दिवशी नववर्ष स्वागतयात्रा काढण्यात आली. यात्रेला अपूर्व प्रतिसाद मिळाला.
श्री देव भैरी जुगाई नवलाई पावणाई तृणबिंदुकेश्वर संस्था आणि श्री पतितपावन मंदिर संस्था यांनी ही ‘ग्राममंदिर ते समाजमंदिर’ अशी स्वागतयात्रा आयोजित केली होती. रत्नागिरीचे ग्रामदैवत असलेल्या श्री देव भैरी मंदिरातून आणि शहरातील मारुती मंदिरातून अशा दोन ठिकाणांवरून निघालेल्या स्वागतयात्रा जयस्तंभ येथे एकत्र आल्या आणि तेथून त्या श्री पतितपावन मंदिराकडे गेल्या. वेगवेगळे संदेश देणारे विविध संस्थांचे चित्ररथ, तसेच लहान मुलांसह विविध वयोगटांमधील स्त्री-पुरुष अनेक देवदेवतांच्या आणि पारंपरिक पोषाखांमध्ये या यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ढोल-ताशांच्या गजरात ही यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली.
नाशिक शहरात ३० शोभायात्रा चे आयोजन विविध संस्था मंडळ यांच्या माध्यमातून करण्यात आले पंचवटी परिसरातून पाच इंदिरानगर परिसरातून १९, सिडको परिसरातून पाच, गंगापूर रोड सातपूर ,नाशिक रोड, म्हसरूळ अशा सर्व ठिकाणाहून अबालवृद्ध या शोभायात्रांमध्ये पारंपारिक वेशभूषेत सामील झाले.
या शोभा यात्रांमध्ये ढोल ताशा पथक ध्वज पथक खडग पथक, लाठीकाठी पथक, शंखनाद पथक, चित्ररथ , घोडे,बैलगाडी,मर्दानी खेळाचे पथक व सर्व वयोगटातील नागरिक सामील होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्म त्रीशताब्दी वर्षानिमित्त अनेक चित्ररथांचा विषय अहिल्यादेवींचे चरित्र असा होता. पर्यावरण रक्षण, सामाजिक समरसता, सद्भाव असे सामाजिक विषय असणारे चित्ररथ सर्वच शोभायात्रांमध्ये बघायला मिळाले.
प्रभू श्री रामचंद्र की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, पुण्यश्लोक अहिल्या देवी की जय या घोषणा शोभा यात्रा मध्ये दिल्या जात होत्या.