गुढीपाडव्यानिमित्त काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मेळावा मोठ्या उत्सात पार पडला. मुंबईतील शिव तीर्थावर आयोजित केलेल्या या मेळाव्यादरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांना संबोधित करताना अनेक महत्वाच्या विषयांवर भाष्य केले. धर्माच्या नावाखाली आपण नद्या बरबाद करत आहोत,असे मोठे वक्तव्य त्यांनी यावेळी बोलताना केले.
दरवर्षी मनसेचा गुढी पाडवा मेलावा चर्चेचा विषय ठरतो कारण या मेळाव्यादरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय बोलणार याची अनेकांना उत्सुकता लागलेली असते. त्यामुळे यावेळी राज्यभरातून आलेल्या मनसैनिकांची मोठी रीघ पाहायला मिळते.यंदाच्या गुढी पाडवा मेळावाही त्याला अपवाद ठरला नाही. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना राज ठाकरे यांनी राज्यातील अनेक महत्वाच्या विषयावर भाष्य केले.
राज ठाकरे यांनी देशातील नद्यांच्या बिकट अवस्थेवर सुद्धा भाष्य केले. “नद्यांकडे राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष आहे. गंगा साफ करण्याचा मुद्दा राजीव गांधी यांनी उचलला होता आणि पंतप्रधान मोदींनी २०१४ साली तेच सांगितले. तरी देखील नद्यांची स्थिती अजूनही खराब आहे,” असे राज ठाकरे म्हणाले आहेत. कुंभमेळ्याला संबोधित करत त्यांनी एक व्हिडीओ दाखवला, ज्यात गंगेची वाईट अवस्था दाखवण्यात आली होती.
नदी प्रदूषणावर बोलताना, राज ठाकरे यांनी राज्यकर्त्यांवर गंभीर टीका केली. “धर्माच्या नावाखाली आपण नद्या बरबाद करत असल्याची भावना त्यानी व्यक्त केली. सर्वांना आपापला धर्म प्रिय आहे, पण यामध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. मुंबईत पाच नद्या होत्या त्यातील चार नद्या मारल्या गेल्या आहेत. सांडपणी,झोपडपट्यां यामुळे त्या मारल्या गेल्या आहेत. आता मिठी नदी उरली आहे,पण तीही मरायला टेकली असल्याची चिंता राज ठाकरे यांनी व्यक्त केली.
राज ठाकरे यांनी झाडांच्या संवर्धनाबद्दलही आपले मत मांडले. “हिंदूंचे अंत्यसंस्कार लाकडावर होतात, जंगलतो़ड झाल्याशिवाय लाकूड येणार नाही. याला पर्याय म्हणून विद्युतदाहिन्या आल्या आहेत. देशभर विद्युतदाहिन्या असायला हव्यात,” पुढे बोलताना ते म्हणाले की,आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी जंगलात गेले होते परदेशी माणसांबरोबर. पंतप्रधानांना जंगलांची आवड आहे. त्यांना प्राण्यांचीही आवड आहे. जंगले जगवली पाहिजेत असेही राज ठाकरे म्हणाले आहेत.