नुकत्याच ईदच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्याक्रमामध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपल्या संदेशात भाजप आणि माकपाच्या नेतृत्वाखालील डाव्या आघाडीवर टीका केली. या दोन्ही विरोधी पक्षांनी राज्यात धार्मिक तणाव निर्माण केला आहे. असे त्यानी म्हंटले आहे. तसेच बॅनर्जी यांनी या विरोधी पक्षांना त्यांच्या भिन्न राजकीय विचारसरणीवरून ‘राम-बाम’ म्हणजेच राम आणि डावे असे संदर्भ देत त्यांच्यावर टीकास्त्र सोडले.
कोलकाता येथील रेड रोडवर ईदच्या नमाज कार्यक्रमाला संबोधित करताना त्यांनी नागरिकांना सांप्रदायिक दंगली भडकवणाऱ्या प्रवृत्तींपासून सावध राहण्याचे आवाहन केले. तसेच पश्चिम बंगाल सरकार अल्पसंख्याकांच्या पाठीशी उभे आहे. राज्यात कोणीही तणाव निर्माण करू शकत नाही. असे बनर्जी यांच्याकडून सांगण्यात आले. ममता बॅनर्जी म्हणाल्या, “आजकाल राम-बाम विचारतात की मी हिंदू आहे की नाही. माझे उत्तर आहे की मी एकाच वेळी हिंदू, मुस्लिम आणि शीख आहे, आणि अखेरीस मी भारतीय आहे. विरोधी पक्ष काय करत आहेत? ते फक्त लोकांना विभागत आहेत. माझे जीवन देशासाठी समर्पित आहे.”
मुख्यमंत्र्यांनी येणाऱ्या ६ एप्रिल रोजी होणाऱ्या रामनवमीदरम्यान धार्मिक तणाव निर्माण करण्याच्या शक्यतेबद्दलही इशारा दिला. या वेळी तृणमूल काँग्रेसचे महासचिव आणि खासदार अभिषेक बॅनर्जीही त्यांच्या सोबत मंचावर होते. भाजपचे नाव न घेता त्यांनी सांगितले की काही लोक राज्यात धार्मिक तणाव निर्माण करण्याचा कट रचत आहेत. त्या म्हणाल्या, “दंगलीसाठी भडकवणाऱ्या लोकांच्या नादाला लागू नका. लक्षात ठेवा, तुमची दिदी तुमच्यासोबत आहे. अभिषेक तुमच्यासोबत आहे. संपूर्ण राज्य सरकार तुमच्यासोबत आहे.”
आता ममता दीदी अल्पसंख्यांकांच्या पाठीशी असतील तर त्या हिंदू असून हिंदूंच्या पाठीशी उभ्या का रहात नाहीत? असा सवाल देखील या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.कारण दिदींनी ईद च्या शुभेच्या द्यायला जेवढी तत्परता दाखवली तेवढी तत्परता नुकत्याच पार पडलेल्या होळीच्या सणाला दाखवली असती तर त्यांच्या भूमिकेवर शंका उपस्थित झाली नसती. होळीच्या सणाच्या दिवशी पश्चिम बंगाल सरकारने शांतिनिकेतन सोनाझुरी हाटमध्ये होळी साजरी करण्यावर बंदी घातली होती. यामुळे त्यांच्यावर टीका देखील झाली होती.
केंद्रीय मंत्री आणि पश्चिम बंगाल भाजप अध्यक्ष सुकांता मजुमदार यांनी तर पश्चिम बंगाल सरकारच्या या निर्णयावर जोरदार टीका केली होती, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तुष्टीकरणाचे राजकारण करतात आणि निवडणूक फायद्यासाठी मुस्लिम मतपेढी सुरक्षित करतात असा आरोप त्यांनी केला होता. यावेळी कथित बंदीला उत्तर देताना, मजुमदार यांनी पश्चिम बंगाल राज्यातील लोकांना पूर्ण उत्साहाने होळी साजरी करण्याचे आवाहन केले होते.