पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी हे स्वतः सक्षम असून त्यांना उत्तराधिकारी शोधण्याची कुठलीही गरज नाही. २०२९ मध्ये देश आणि देशातली जनता पुन्हा त्यांनाच पंतप्रधान म्हणून पाहण्यास इच्छुक असल्याच विधान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. नागपूरमध्ये एका कार्यक्रमानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हे विधान केलं.
पंतप्रधान मोदी हे आता ७५ वर्षांचे होतं आहेत. तसेच येत्या २०२९ पर्यंत ते ७८ वर्षांचे होणार आहेत. त्यामुळे वयाची ७५ वर्ष पूर्ण झाल्यावर राजकारणातून दूर व्हावे आणि नव्या पिढीला संधी द्यावी, असे फर्मान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच काही वर्षांपूर्वी काढल्यामुळे आता हा नियम त्यांनाही लागू होऊन २०२९ साठी भाजप पंतप्रधान पदाचा नवा चेहरा शोधणार का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यावर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींचे उत्तराधिकारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहतील असे सूचक वक्तव्य केले होते. त्यावर आता खुद्द फडणवीस यांनी उत्तर देत या चर्चेला पूर्ण विराम दिला आहे.
यावेळी फडणवीस पुढे म्हणाले की, सर्वांना विश्वासात घेऊन राज्याच्या कारभार सुरू आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी जे लोक आम्हाला मदत करतील त्या सर्वांना सोबत घेऊनच आम्ही काम करणार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः सक्षम आहेत. त्यांना कुठल्याही पद्धतीची अडचण नाही. त्यामुळे मोदींचा उत्तराधिकारी शोधण्याची कुठलीही गरज नाही. ते अजून बरेच वर्ष काम करू शकतात. २०२९ मध्ये पंतप्रधान म्हणून देश मोदींकडे पाहत आहे. वडील जिवंत असताना त्यांचा वारसदार शोधणे ही आमच्या देशाची परंपरा नाही. ही मुघली संस्कृती आहे आणि तसाही उत्तराधिकारी याच्याशी माझा कुठलाही संबंध नाही, असेही फडणवीस म्हणाले.
दरम्यान, काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी नुकतेच एका लेखाच्या माध्यमातून नवीन शिक्षण पद्धतीवर ताशेरे उडले आहेत. या संदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांना विचारणा केली असता ते म्हणाले की सोनिया गांधींनी आता तरी भारतीय शिक्षण पद्धतीचा स्वीकार करावा. तसेच भारतीय शिक्षण पद्धतीचे भारतीयकरण होणे यात कुठलाही गैरप्रकार नाही. लॉर्ड मेकाले यांनी आम्हाला गुलाम बनवण्यासाठी जुनी शिक्षण पद्धती आणली होती. त्यामुळे ती आम्हाला कदापी मान्य नाही असे फडणवीस म्हणाले.