छत्तीसगडमधील विजापूर-सुकमा येथे झालेल्या दोन मोठ्या चकमकींनंतर रविवारी 50 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. यामध्ये काही महिला नक्षलवाद्यांचाही समावेश आहे. आत्मसमर्पण केलेल्या 50 पैकी 13 नक्षलवाद्यांवर एकूण 68 लाख रुपयांचे बक्षीस होते. त्यांनी आज विजापूर पोलिस अधीक्षक कार्यालयात पोलिस अधीक्षक, डीआयजी, सीआरपीएफ आणि इतर पोलिस अधिकाऱ्यांसमोर आत्मसमर्पण केले आहे.
या संदर्भात विजापूरचे पोलीस अधीक्षक डॉ.जितेंद्र यादव म्हणाले आहेत की, ‘एवढ्या मोठ्या संख्येने नक्षलवाद्यांनी एकत्र येऊन आत्मसमर्पण केल्याने नक्षलवादी संघटनेला मोठा धक्का बसला आहे. आत्मसमर्पण करून समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील झालेल्या सर्व नक्षलवाद्यांना प्रोत्साहन म्हणून प्रत्येकी 25,000 रुपयांचा धनादेश देण्यात आला आहे.’
नक्षलवाद्यांच्या आत्मसमर्पणामागे जिल्ह्यात होत असलेली विकासकामे हे प्रमुख कारण असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. जलदगतीने होणारे रस्ते आणि गावांपर्यंत पोहोचणाऱ्या विविध सुविधांचा त्यांना फटका बसला आहे. संघटनेच्या कल्पनांबद्दलचा भ्रम आणि निराशा आणि संघटनेतील अंतर्गत मतभेद हे त्यांच्या आत्मसमर्पणाचे प्रमुख कारण आहे.
छत्तीसगड सरकारच्या पुनर्वसन धोरणाने अनेक नक्षलवाद्यांना नवी आशा दिली आहे आणि त्यांना संघटनेतील शोषण आणि क्रूर वागणुकीतून बाहेर येण्याची प्रेरणा दिली आहे. हे धोरण त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात परत येण्याची आणि सामान्य जीवन जगण्याची आशा देते. याशिवाय अंतर्गत भागात सुरक्षा दलांकडून सातत्याने छावण्या उभारणे आणि त्या भागात राबवण्यात येत असलेल्या आक्रमक कारवाया यामुळेही माओवाद्यांनी संघटना सोडत मुख्य प्रवाहात येण्याचा निर्णय घेतला आहे.’