म्यानमारमधील भूकंपानंतर भारताने मदतीचा हात पुढे करत तिन्ही सैन्य दलांमार्फत राबवण्यात येणाऱ्या ‘ब्रह्मा’ अभियानाला गती आणली असून, नौदलाची दोन जहाजे म्यानमारमधील यंगून शहरात पोहोचली आहेत. याशिवाय म्यानमारच्या मदतीसाठी आणखी दोन जहाजे पाठवण्यात आली आहेत. मंगळवारी ही जहाजे पोहचतील व बचाव कार्यात सहभाग घेतली.
भारतीय लष्कराचे 118 सदस्यीय हॉस्पिटल युनिट देखील सोमवारी आग्राहून म्यानमारमधील मंडाले शहरात पाठवण्यात आले आहे. हे पथक याठिकाणी 60 खाटांचे वैद्यकीय उपचार केंद्र उभारून भूकंपग्रस्तांना आपत्कालीन वैद्यकीय सेवा पुरवणार आहे. याचबरोबर भारतीय हवाई दलाने आतापर्यंत तीन वाहतूक विमानांद्वारे 96.3 टन मदत सामग्री म्यानमारला पोहोचवली आहे.
भूकंपग्रस्त म्यानमारमध्ये भारतीय लष्कर, भारतीय हवाई दल आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) यांच्या सहकार्याने वेगाने बचाव कार्य सुरु झाले आहे. म्यानमारमध्ये 28 मार्च रोजी झालेल्या विनाशकारी भूकंपानंतर भारत सरकारने ऑपरेशन ‘ब्रह्मा’ अंतर्गत म्यानमारला मदत केली आहे. आता या ऑपरेशनला गती आली असून, मदत कार्याला वेग आला आहे.
दरम्यान, म्यानमारवर ओढवलेल्या या कठीण परिस्थिती अनेक देश मदतीचा हात पुढे करत आहेत. भारत देखील यात मागे नाही.