“येशु येशु” या गाण्यामुळे प्रसिद्ध असलेले स्वयंघोषित पाद्री बाजींदरसिंग यांना २०१८ च्या बलात्काराच्या प्रकरणात मोहाली सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने त्यांना भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६ (बलात्कार), कलम ३२३ (दुखापत करणे) आणि कलम ५०६ (गुन्हेगारी धमकी देणे) यासह अनेक कलमांखाली दोषी ठरवले. २८ फेब्रुवारी रोजी एका २२ वर्षीय महिलेने झिरकपूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर हा खटला सुरू करण्यात आला.
निकालाच्या दिवशी, सुरक्षेसाठी न्यायालयात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अलिकडेच, सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला होता, ज्यामध्ये बाजींदरसिंग एका महिलेशी भांडताना दिसत आहे, त्यादरम्यान तो तिच्या कानशीलात लगावत असल्याचे दिसुन आले. या घटनेनंतर, मोहाली पोलिसांनी ३५ वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून आणखी एक गुन्हा दाखल केला. सध्या यासंदर्भात अधिक तपास सुरू आहे.
न्यायालयाच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना, पीडितेच्या पतीने समाधान व्यक्त केले आहे आणि म्हटले, आहे की “आम्ही सात वर्षे या खटल्यासाठी लढलो.त्याने न्यायालयाला भरकटवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान न्यायालयाचा आदेश झुगारुन तो अनेकदा परदेशात गेला होता. माझ्यावर खोटी केस दाखल करण्यात आली, आमच्यावर हल्ला करण्यात आला, मी सहा महिने जेलमध्ये घालवले. त्यानंतर आम्ही त्याला धडा शिकवण्याचे ठरवले होते. न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास होता. आम्ही न्यायालयाच्या निकालाचं स्वागत करतो”