भारतीय वंशाच्या नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांची टीम आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून (ISS) नऊ महिन्यांच्या मोहिमेनंतर ८ मार्च रोजी सुरक्षितपणे पृथ्वीवर परतली. सुरुवातीला त्यांची थोड्या काळासाठी अंतराळात राहण्याची योजना होती, परंतु तांत्रिक कारणांमुळे त्यांचा अंतराळातील वेळ वाढला. परत आल्यावर, त्यांनी माध्यमांशी बोलताना, सुनीता यांनी आपले अनुभव कथन केले आहेत. तसेच यादरम्यान त्यांनी भारताबद्दलही भाष्य केले आहे.आणि पुन्हा एकदा भारताला भेट देण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
भारताबद्दल बोलताना सुनीता म्हणाल्या की, भारत एक महान देश आहे.जेव्हा सुनीता विल्यम्स यांना विचारण्यात आले की, भारत अंतराळातून कसा दिसतो तेव्हा त्या म्हणाल्या की, भारत अद्भुत दिसतो. जेव्हा जेव्हा अंतराळ स्थानक हिमालयावरून जात असे तेव्हा तेव्हा त्याचे अनोखे फोटो मिळत असत. हिमालय पर्वतरांगा अवकाशातून येणाऱ्या लाटांसारख्या दिसतात. अंतराळातून भारताकडे पाहिल्यास असे वाटते की, जणू मोठ्या शहरांपासून लहान शहरांपर्यंत प्रकाशाचे जाळे तयार झाले आहे.
त्या पुढे म्हणाल्या की, “मला वाटतं जेव्हा तुम्ही पूर्वेकडून गुजरात आणि मुंबईकडे येता, तेव्हा किनाऱ्याजवळ असलेल्या मासेमारीच्या बोटी ‘आम्ही आलो आहोत’ असा संकेत देतात.” म्हणजे त्या बोटींमुळे कळतं की आपण भारताजवळ पोहोचलो आहोत.
सुनिता यांची त्यांच्या वडिलांच्या मायदेशी परत येण्याची इच्छा आहे. अक्सिओम मिशनसह भारतीय अंतराळवीर अंतराळात जाण्याबद्दल त्या खूप उत्सुक असल्याचे त्यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, भारत हा एक महान देश आणि एक अद्भुत लोकशाही आहे. भारताने अंतराळ क्षेत्रात खूप प्रगती केली आहे. भारत गगनयान मोहिमेद्वारे अंतराळवीरांना अंतराळात पाठवण्याची तयारी करत आहे.
सुनीता विल्यम्स यांनी त्यांच्या कारकिर्दीत एकूण ३२२ दिवस अंतराळात घालवले आहेत. १९६५ मध्ये अमेरिकेतील ओहायो येथे जन्मलेल्या सुनीता यांचे वडील दीपक पंड्या हे भारतातील गुजरात येथील रहिवाशी आहेत. तर त्यांची आई स्लोव्हेनियन वंशाची आहे. १९५७ मध्ये दीपक वैद्यकीय पदवी मिळविण्यासाठी अमेरिकेत गेले.
२००७ आणि २०१३ च्या अंतराळ मोहिमांनंतर, सुनीता यांनी भारताला भेट दिली होती.आणि आता त्यांनी परत भारतात येण्याची इच्छा व्यक्त केली आहे.