देशात सध्या इतके धर्मगुरू झाले आहेत की आज प्रत्येक शहराच्या प्रत्येक गल्लीत एक तरी बाबा सापडतोच. एवढेच काय तर या बाबांना परिसरात हजारो लोक मानतात आणि त्यांचे गुणगान देखील गातात. कधी कोणता बाबा चावी फिरवून वेदना दूर करताना दिसतो, तर काही लोक येशूच्या नावाने लोकांच्या समस्या सोडवण्याचा दावा करतात. दरम्यान, याच ढोंगी बाबांची पोल खोल करणारा एक प्रकार समोर आला आहे.
नुकतीच मोहाली जिल्हा न्यायालयाने येशूचे दूत म्हणून काम करणाऱ्या पाद्री बाजिंदर सिंग याला बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
2018 मध्ये त्याच्याविरुद्ध जिरकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. एका मुलीच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर बाजिंदरला दिल्ली विमानतळावरून अटक करण्यात आली होती. मात्र, बाजिंदरची जामिनावर सुटका झाली होती.
एवढेच नाही तर 28 फेब्रुवारीला बाजिंदरवर आणखी एक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर तीन सदस्यीय पोलिस पथकाने या प्रकरणाचा तपास सुरू केला. त्याच्याविरुद्ध सतत तक्रारी आल्यानंतर तपासात बाजिंदर दोषी आढळला.
आता नेमकं प्रकरण काय आहे? पाहूया…
झिरकपूर पोलिसांनी पाद्री बाजिंदर सिंग आणि अन्य सहा आरोपी, अकबर भाटी, राजेश चौधरी, सुचा सिंग, जतिंदर कुमार, सितार अली आणि संदीप उर्फ पहेलवान यांच्या विरोधात कलम ३७६, ४२०, ३५४, २९४, ३२३, ५०६, १४८ सी अन्वये पीडितेच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल केला.
पीडितेने आरोप केला की, ‘बाजिंदरच्या सभांना ती जात असताना बाजिंदरने पीडितेची सर्व माहिती काढली आणि नंतर तिला एका हॉटेलमध्ये जेवायला बोलवलं. यावेळी त्याने तिला सोबत पासपोर्ट देखील घेऊन येण्यास सांगितले. यावेळी बाजींदर तिला स्वतःच्या फ्लॅटवर घेऊन गेला. बाजींदरने पीडितेला सांगितले की, तो लवकरच यूकेला जाणार आहे आणि तिला सोबत नेण्याचे आश्वासन दिले.
परदेशात जाण्याच्या प्रक्रियेत तिला मदत करण्याच्या बहाण्याने त्याने पीडितेशी शारीरिक संबंध ठेवले आणि तिला बेशुद्ध केल्यानंतर पिडितेचे आक्षेपार्ह व्हिडिओ बनवले.
यानंतर बाजिंदरने परदेश दौऱ्यासाठी मोठ्या रकमेची मागणी केली आणि पैसे न दिल्यास व्हिडिओ सार्वजनिक करण्याची धमकी दिली. अशाप्रकारे पीडितेला धमकी देऊन तो तिच्यावर वारंवार बलात्कार करत होता.
या प्रकरणात, अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश विक्रांत कुमार यांच्या न्यायालयाने 28 मार्च रोजी निर्णय देताना बाजिंदर सिंगला भारतीय दंड संहितेच्या कलम 376 (बलात्कार), 323 (स्वेच्छेने दुखापत करणे) आणि 506 (गुन्हेगारी धमकी) अंतर्गत दोषी ठरवले. यानंतर त्याला तात्काळ ताब्यात घेऊन जन्मठेपेची शिक्षा सुनावत पटियाला तुरुंगात पाठवले. पुराव्याअभावी न्यायालयाने उर्वरित आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
जेव्हा बाजिंदर सिंगला अटक झाली तेव्हा त्याच्या समर्थकांनी मात्र, न्यायालयासमोर गोंधळ घातला. या सर्व प्रकारावरून अशा गुन्हेगार लोकांवर डोळे झाकून विश्वास ठेवणाऱ्यांवर अनेक प्रश्न उपस्थित झाले.
ज्या धर्मगुरूला आपण आपला देव मानत आलो आहोत तोही चुकीचा असू शकतो हे मान्य करायला देखील आज अंध भक्त तयार नाहीत. अशा प्रकाराची ही पहिलीच वेळ नाही तर याआधीही असे अनेक धर्मगुरू समोर आले आहेत जे आपल्या वाईट कृत्यांसाठी तुरुंगवास भोगत आहेत. पण यावेळीही अंध भक्त या धर्मगुरूंच्या बचावासाठी समोर आले होते.
बाजिंदर सिंग शिवाय ‘हे’ बाबाही भोगत आहेत तुरुंगवासाची शिक्षा….
संत रामपाल
सतलोक आश्रमाचे संस्थापक आणि कबीर पंथाचे नेते संत रामपाल याला हिसार न्यायालयाने 2018 मध्ये दोषी ठरवले होते. तेव्हापासून तो तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. संत रामपालच्या आश्रमात पाच महिला आणि एका मुलाचा मृतदेह सापडला होता.
बाबा राम रहीम
गुरमीत राम रहीम सिंग हा त्याच्या दोन शिष्यांवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली हरियाणाच्या रोहतक जिल्ह्यातील सुनारिया तुरुंगाची हवा खात आहे. जेव्हा बाबा राम रहीमला तुरुंगात टाकण्यात आले होते तेव्हा भारतभर विविध भागांत त्याच्या निदर्शने करण्यात आली होती.
इच्छाधारी भीमानंद
श्रीमूरत द्विवेदी यांनी एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम केले आणि 1988 मध्ये स्वत:ला बाबा घोषित केले. याच बाबाच्या ठिकाणी काम करत असलेल्या एका महिलेने त्याचा पर्दाफाश केला होता. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी तपास केला असता भीमानंद सेक्स रॅकेट चालवत असल्याचे आढळून आले होते.
आसाराम बापू
आसाराम बापू सध्या जोधपूरमध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. 2018 मध्ये, विशेष SC/ST न्यायालयाने आसारामला अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरवले होते. आसाराम बापू आणि त्याचा मुलगा नारायण साई हे दोघेही तुरुंगात आहेत. याशिवाय अनेक बाबा आणि धर्मगुरू आहेत ज्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत.
पण असे असूनही लोकांची त्यांच्याबद्दलची ओढ कमी होताना दिसत नाही. देशात असे अनेक ढोंगी धर्मगुरू कोणत्या न कोणत्या आरोपाखाली तुरूंगाची हवा खात आहेत पण तरीही लोकांची अशा बाबांवरची श्रद्धा कमी होताना दिसत नाही. आणि हाच सध्या चिंतेचा विषय बनत आहे.
भारतात, आजही मोठ्या संख्येने लोक चमत्कारांवर विश्वास ठेवतात. अशास्थितीत केवळ ढोंगी बाबांच्या अटकेने ही मानसिकता संपवणे अवघड आहे. धर्म आणि अध्यात्म हे भारतातील लोकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. शतकानुशतके, लोकांनी गुरु आणि संतांना ज्ञान, मार्गदर्शन आणि मानसिक शांतीचे स्रोत मानले आहे.
पण गेल्या काही दशकात एक नवीन ट्रेंड दिसला आहे तो म्हणजे ‘गॉडमन सिंड्रोम’ (म्हणजेच एक प्रकारचा आजार). गेल्या काही वर्षांत तथाकथित धर्मगुरूंना बलात्कार, खून, फसवणूक आणि बेकायदेशीर कृत्यांच्या आरोपाखाली तुरुंगात पाठवण्यात आले आहे. पण तरीही अशा लोकांना देव मानणाऱ्या लोकांची संख्या कमी नाही. अशातच आता समाजातील ‘गॉडमॅन सिंड्रोम’ नाहीसा होणार की या बाबांची परंपरा कायम राहणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.