छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या अडचणी आता वाढताना दिसत आहेत. बघेल यांच्या निवासस्थानी सीबीआयने नुकताच छापा टाकला होता. आता सीबीआयने त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. ६००० कोटी रुपयांच्या महादेव ॲप ऑनलाईन बेटिंग घोटाळा प्रकरणी सीबीआयने ही कारवाई केली आहे. या प्रकरणी सीबीआयने २१ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
केंद्रीय अन्वेषण विभागाने बघेल यांना महादेव ॲप घोटाळ्यात आरोपी बनवले आहे. 6000 कोटी रुपयांच्या ऑनलाइन सट्टेबाजी घोटाळ्याशी संबंधित एफआयआरमध्ये बघेल यांचे देखील नाव आता समाविष्ट करण्यात आले आहे. सीबीआयने बघेल यांच्या निवासस्थावर छापा टाकल्याच्या एका आठवड्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एफआयआरमध्ये म्हटले आहे की, ‘महादेव बुक ॲपच्या मालकांनी पोलिस अधिकारी, प्रशासकीय अधिकारी आणि प्रभावशाली राजकीय व्यक्तींना संरक्षण मनी म्हणून मोठ्या प्रमाणात पैसे दिले आहेत जेणेकरून त्यांच्या बेकायदेशीर कृतींवर कारवाई होऊ नये. हा पैसा मध्यस्थींच्या माध्यमातून पोलिस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचला आणि नंतर वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि प्रभावशाली राजकीय व्यक्तींपर्यंत पोहोचला. यामध्ये बघेल यांना देखील पैसे देण्यात आले होते. असा आरोप आहे.
सीबीआयने 18 डिसेंबर 2024 रोजी या प्रकरणी एफआयआर नोंदवला होता. सीबीआयने छत्तीसगड पोलिसांकडून तपास हाती घेतल्यानंतर बघेल यांना या प्रकरणात आरोपी बनवले आहे.