बांगलादेशच्या माहिती सल्लागाराने भारताबद्दल एक विचित्र विधान केले आहे. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षाचे एक लाखाहून अधिक सदस्य भारतात पळून गेल्याचा दावा त्यांनी केला आहे.
बांगलादेशचे माहिती सल्लागार महफूज आलम यांनी ईदच्या मुहूर्तावर ढाका येथे आयोजित एका कार्यक्रमात हे वक्तव्य केले आहे. शेख हसीना यांच्या कार्यकाळात बेपत्ता झालेल्या व मारल्या गेलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांसमोर त्यांनी असा दावा केला आहे.
महफूज आलम यांनी यावेळी शेख हसीना यांच्यावर टीका करत म्हंटले आहे की, ‘शेख हसीना यांनी त्यांच्या आई-वडिलांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी जबरदस्तीने लोकाना बेपत्ता करण्याची आणि खून करण्याची पद्धत अवलंबली. भारताने त्यांना आणि त्यांच्या दहशतवादी शक्तींना आश्रय देण्याचे निवडले हे दुर्दैव आहे. आम्हाला कळले आहे की सुमारे १,००,००० अवामी लीग सदस्यांनी तिथे आश्रय घेतला आहे.’
दरम्यान, याआधीही बांगलादेशमधून भारताबद्दल अशी विधाने आली आहेत. आता महफूज यांच्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. महफूज आलम यांचे हे वक्तव्य अशावेळी आले जेव्हा भारतात अवैधरित्या राहणाऱ्या बांगलादेशींवर कारवाई सुरु आहे.