Beed News: उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे 2 एप्रिल रोजी बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी अजित पवार यांनी बीडमध्ये घडत असलेल्या घटनांवरती आणि बीडच्या बदनामीवरती भाष्य केले. तसेच बीडला पुन्हा नाव लौकिक करण्याची तयारीही त्यांनी दर्शवली आहे.
अजित पवार म्हणाले की, “काही चुकीच्या लोकांकडे दुर्लक्ष केल्यामुळे आणि नको तेवढी मोकळीक दिल्यामुळे बीड जिल्हा बदनाम झाला आहे. परंतु आता पुन्हा एकदा बीड जिल्ह्याला लौकिक मिळून द्यायचा आहे. बीडमधील विकृत लोकांना सरळ करणार म्हणजे करणार. कोणी कितीही मोठ्या बापाचा असो किंवा कोणत्याही नेत्याच्या जवळचा असो, त्याला सरळ करणार म्हणजे करणार”. एकंदरित अजित पवारांनी बीडमध्ये होणारी गुन्हेगारी कमी करण्याचा निर्धार केल्याचे यावरून स्पष्ट होते.
बीडमध्ये अजित पवारांनी पत्रकारांवरतीही निशाणा साधला. “वस्तूस्थितीला धरून बातम्या दिल्या पाहिजेत, टी आर पी साठी कधी कधी बातम्या रंगवून सांगितल्या जातात, मात्र तसे करू नका. बीड आणि बिडकरांची बदनामी थांबवण्यासाठी एकत्र आले पाहिजे. चुकीच्या गोष्टीला समर्थन न करता सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्र आले पाहिजे” , असेही अजित पवार यावेळी पत्रकारांना उद्देशून म्हणाले.
या भाषणात अजित पवारांचा रोष काहीसा धनंजय मुंडेंवरतीही दिसतो. नको तेवढी मोकळी दिली, हे त्यांनी वाल्मिक कराडला उद्देशून म्हटले आणि वाल्मिक कराड धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय आहे. परंतु अजित दादांनी भाषणात ज्या प्रमाणे बीडमधील गुन्हेगारी कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याची तयारी दर्शवलीय ती केवळ भाषणापुरती मर्यादित न ठेवता प्रत्यक्षात मोहीम हाती घेणे गरजेचे आहे. अन्यथा बीड बिहार व्हायला वेळ लागणार नाही.