अमेरिकेने नुकतीच एक घोषणा केली आहे. ज्यामुळे भारताला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही देशांवर टॅरिफ शुल्क (आयात शुल्क) लागू करण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार भारतावर 27 टक्के टॅरिफ शुल्क लादण्यात येणार असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले आहे. यापूर्वी मात्र, ट्रम्प यांनी 26 टक्के शुल्क लादणार असल्याचे सांगितले होते.
भारताव्यतिरिक्त अमेरिकेने चीनवर 34 टक्के, युरोपियन युनियनवर 20 टक्के, दक्षिण कोरियावर 25 टक्के, जपानवर 24 टक्के, व्हियेतनामवर 46 टक्के व तैवानवर 32 टक्के शुल्क आकारण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. अमेरिकेने जवळपास 60 देशांवर टॅरिफ शुल्क लादण्याचा निर्णय घेतला आहे.
यासोबतच इतर देशांतून अमेरिकेत येणाऱ्या सर्व वस्तूंवर 10 टक्के शुल्क लागू केले जाणार असल्याचे जाहीर केले आहे.
टॅरिफ शुल्काचा भारतावर काय परिणाम होणार?
भारत आणि अमेरिकेतील व्यापार आधीच अनेक मुद्द्यांवरून तणावपूर्ण आहे. अशातच आता टॅरिफ शुल्क (आयात कर) लादल्याने भारतीय कंपन्यांना अमेरिकेत व्यवसाय करणे महागात पडू शकते. ट्रम्प यांच्या निर्णयामुळे भारतीय उत्पादनांवर जास्त कर लादल्याने अमेरिकन ग्राहकांना त्या वस्तू महागड्या दरात विकाव्या लागतील. ज्यामुळे बाजारात त्याची मागणी कमी होऊ शकते.
तसेच अमेरिकेसोबत वाढत्या व्यापार तणावामुळे भारतीय रुपया कमकुवत होऊ शकतो. जागतिक गुंतवणूकदार भारतात गुंतवणूक करण्यापासून लांब राहण्याचा निर्णय घेऊ शकतात, ज्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर होऊ शकतो. असं तज्ञांकडून सांगण्यात येत आहे.