टेस्ला कंपनीचे सह-संस्थापक, सीईओ आणि अमेरिकन सरकारमध्ये गव्हर्नमेंट इकॉनॉमी प्रमुख इलॉन मस्क यांनी हिंदूंच्या भावना दुखावणारे ट्विट केले आहे. ज्यामुळे ते आता वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. हिंदूंसाठी पवित्र मानले जाणारे स्वस्तिक चिन्ह हे द्वेषाचे प्रतीक असल्याचं मस्क यांनी म्हंटल आहे.
मस्क यांनी नाझी हेकेनक्रूझ चिन्हाचा स्वस्तिक म्हणून उल्लखे केला आहे. जे द्वेषाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते. गेल्या काही दिवसांपासून टेस्लाची वाहने आणि त्यांच्या सुपरचार्जर नेटवर्कवर हल्ले होत आहे. अमेरिकेच्या विविध भागात हे हल्ले होत आहेत. वाहने फोडल्याचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. असाच एक व्हिडिओ मस्क यांनी आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे.
मस्क यांनी शेअर केलेल्या व्हिडिओत ते स्वतः दिसत आहेत. या व्हिडिओत एक अनोळखी व्यक्ती त्यांच्याशी वाद घालत आहे. या अनोळखी व्यक्तीने टेस्ला EV वर नाझी चिन्ह काढले होते. याच व्हिडिओवर कमेंट करत मस्क यांनी नाझी चिन्हाचा स्वस्तिक म्हणून उल्लेख केला आहे. ‘ज्याने टेस्लावर स्वस्तिक काढले त्याने स्पष्टपणे द्वेषपूर्ण गुन्हा केला आहे.’ असं त्यांनी म्हंटल आहे.
दरम्यान, हिंदूंसाठी पवित्र असलेल्या स्वस्तिक चिन्हाचा मस्क यांनी अवमान केला असून, त्यांच्यावर टीका होत आहे. स्वस्तिक चिन्हाचा भारतात उगम झाला आहे. असे अनेक विद्वानही मान्य करतात. हे चिन्ह हिंदू, बौद्ध आणि जैन तसेच वायकिंग आणि ग्रीक लोकांसह इतर प्राचीन संस्कृतींसाठी सौभाग्य, समृद्धी आणि सर्व शुभ गोष्टींचे प्रतीक आहे. स्वस्तिक आणि नाझी द्वेषाचे प्रतीक हेकेनक्रूझ यांच्यात खूप फरक आहे. मात्र, मस्क यांनी अशाप्रक्रारे ट्विट करून हिंदूंच्या भावना दुखावणं चुकीचं आहे.