वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत दीर्घ चर्चेनंतर मंजूर करण्यात आले आहे. आता हे विधेयक राज्यसभेतही सादर झाले आहे. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी वक्फ दुरुस्ती विधेयक दोन्ही सभागृहात मांडले आहे. दरम्यान, हे विधेयक मुस्लीम समाजाच्या हक्कावर गदा आणणारे आहे असे म्हणत विरोधी पक्ष या विधेयकाला विरोध करत आहेत. दुसरीकडे अनेकजण मात्र, या विधेयकाचे समर्थन करत आहेत.
देशातील अनेक भागात वक्फ बोर्डाने सरकारी आणि खाजगी जमीन वक्फ मालमत्ता म्हणून घोषित केल्याच्या बातम्या आल्यानंतर वक्फ बोर्ड कायद्यात बदल करण्याची मागणी होऊ लागली. त्यानंतर अखेर हे विधेयक सभागृहात मांडण्यात आले.
एकट्या महाराष्ट्रात सध्या वक्फ बोर्डच्या तब्बल 23566 मालमत्ता आहेत. या मालमत्तेच्या 60 टक्के पेक्षा जास्त भागावर अतिक्रमण झाल्याचे समोर आले आहे. अशास्थितीत अनेकांनी चिंता व्यक्त केली होती. दरम्यान, वक्फने महाराष्ट्रातील मंदिरांची जागा देखील आपल्या ताब्यात घेतल्या असल्याच्या बातम्या आता समोर येत आहेत.
कोल्हापूरच्या वडणगे गावातील महादेव मंदिरावर वक्फ बोर्डाने दावा केला असून, बीडमधील कंकालेश्वर मंदिराची 12 एकर जमीन वक्फ बोर्डाने जबरदस्तीने ताब्यात घेतली असल्याची खळबळजनक माहिती गृहमंत्री अमित शाहांनी सभागृहात दिली.
अमित शाह यांनी संसदेत बीडच्या कंकालेश्वर मंदिराच्या जमिनीचा उल्लेख केल्यानंतर हे प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. बीड जिल्ह्यात वक्फ बोर्डाच्या अनेक मालमत्ता आहेत, परंतु त्या कायदेशीर मालकीच्या आहेत की अतिक्रमित, याबाबत स्पष्टता नाही. कंकालेश्वर मंदिराच्या मागील भागातील सर्वे नंबर 91, 92 आणि 1 वक्फ बोर्डाच्या मालकीचे असल्याचा दावा केला जात आहे.