Narendra Modi:पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून ( ३ एप्रिल) बिमस्टेक शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी दोन दिवसांच्या थायलंड दौऱ्यावर आहेत. मोदींनी आज थायलंडचे पंतप्रधान पाइतोंग्तार्न शिनावात्रा यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषदेला संबोधित केले. यावेळी मोदींना सर्वप्रथम २८ मार्च रोजी थायलंडमध्ये झालेल्या भूकंपात प्राण गमावलेल्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर त्यांनी भारत आणि थायलंडमधील धार्मिक आणि सांस्कृतिक संबंधांवर चर्चा केली.
मोदी म्हणाले की,”भारत आणि थायलंडचे संबंध शतकानुशतके जुने आहेत. आपल्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक संबंधांद्वारे ते जोडलेले आहेत. बौद्ध धर्माच्या प्रसाराने दोन देशांना जोडले आहे. आयुथयापासून नालंदापर्यंत, बुद्धिजीवींची देवाणघेवाण झाली आहे. रामायणाच्या कथा थाई लोकांच्या जीवनाचा एक भाग आहेत,” असे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे.
विशेष म्हणजे आज दोन्ही देशांमध्ये एमएसएमई, हातमाग आणि हस्तकला क्षेत्रात सहकार्यासाठी करार झाला आहे. तसेच अक्षय ऊर्जा, डिजिटल तंत्रज्ञान, ई-वाहने, रोबोटिक्स, अवकाश, जैवतंत्रज्ञान आणि स्टार्ट-अप्समध्ये सहकार्य वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दोन्ही देशांमधील फिनटेक कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी काम केले जाणार आहे.
दरम्यान, मोदी जेव्हा थायलंडची राजधानी बँकॉक येथे पोहचले तेव्हा त्यांनी विमानतळावर भारतीय समुदायाच्या लोकांनच्या भेटी घेतल्या. त्यानंतर मोदींनी थायलंड सरकारने १८ व्या शतकातील रामायण भित्तिचित्रांवर आधारित एक स्मारक टपाल तिकीट जारी केले आहे त्याचीही पाहणी केली.