Manoj Kumar: भारतीय चित्रपटसृष्टीतील एक सुवर्णअध्याय आज संपला आहे. ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक मनोज कुमार यांनी आज ( ४ एप्रिल ) मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात वयाच्या ८७ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या जाण्याने हिंदी चित्रपटसृष्टीत एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
१९५७ मध्ये ‘फॅशन’ या चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनयाची कारकिर्द सुरु केली होती. १९६० मध्ये ‘कांच की गुड़िया’ या चित्रपटात ते पहिल्यांदा मुख्य भूमिकेत दिसले. हा चित्रपट सुपरहिट ठरला. त्यानंतर उपकार, पत्थर के सनम, रोटी कपडा और मकान, संन्यासी आणि क्रांती यांसारखे अनेक सुपरहिट चित्रपट त्यांनी केली. त्यांच्या बहुतेक चित्रपटांमध्ये त्यांचे नाव ‘भारत’ असे असायचे. याच कारणामुळे चाहत्यांमध्ये ते ‘भारत कुमार’ म्हणून लोकप्रिय झाले होते.
त्यांच्या निधनाची बातमी समोर येताच सोशल मीडियावर चाहत्यांकडून आणि सेलिब्रिटींकडून शोक व्यक्त करण्यात येत आहे. चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी शोक व्यक्त करत म्हटले आहे की, “महान दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते आणि भारतीय सिनेमाचा ‘सिंघम’ आज आपल्यात राहिला नाही. हे चित्रपटसृष्टीसाठी मोठे नुकसान आहे”.
मनोज कुमार यांना उपकार या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांनी सामाजिक, राजकीय आणि देशभक्तीची मूल्ये आपल्या चित्रपटांमधून प्रभावीपणे मांडली. त्यांच्या योगदानासाठी त्यांना पद्मश्री आणि दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरवण्यात आले होते.