Deenanath Mangeshkar hospital: पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या सावळ्या गोंधळामुळे गर्भवती तनिषा सुशांत भिसे या महिलेचा मृत्यू झाला आहे. रूग्णालयाच्या प्रशासनाने उपचार सुरू करण्यापूर्वी पैशांची मागणी केली. त्यानंतर पैसे भरू असे, आश्वासन कुटुंबियांनी देऊनही रूग्णालयाने उपचार न केल्याने पैशांअभावी तनिषा यांचा मृत्यू झाल्याने पुण्यात मोठी खळबळ उडाली आहे.
या महिलेच्या पोटात जुळी अपत्ये होती त्यातच ब्लिडींग आणि बीपी वाढल्याने परिस्थीती गंभीर झाली होती. जेव्हा तनिषा यांना रूग्णालयात नेण्यात आले तेव्हा रूग्णालयाच्या प्रशासनाने २० लाख रूपये खर्च येईल असे सांगितले. प्रीमॅच्युअर डिलीव्हरी असेल, बाळांना सातव्या महिन्यामुळे NICU मध्ये ठेवावे लागेल, असे डॉक्टरांनी सांगितले होते. डॉक्टरांनी त्याचवेळी NICU चा खर्च प्रत्येक बाळाचा दहा-दहा लाख रुपये आहे. तुम्हाला आता २० लाख रुपये डिपॉझिट द्यावे लागतील, असे सांगितले. कुटुंबियांनी विनंती केल्यानंतर ते १० लाखांवरती आले, पण पूर्ण पैसे भरल्याशिवाय उपचार सुरू होणार नाहीत आणि तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही ससूनला जाऊ शकता, असे रूग्णालयाने सांगितले.
विशेष म्हणजे हातात असलेले अडीच लाख रूपये भरायला कुटुंब तयार असतानाही उपचार सुरू करायला प्रशासन तयार झाले नाही. शेवटी इतर रुग्णालयात हलवत असताना तनिषा यांना त्रास झाला आणि त्यांनी जुळ्या मुलांना जन्म दिला आणि त्यांचा मृत्यू झाला.
ही घटना काळीज सुन्न करणारी आहे. बीपी इतका वाढलेला असताना ब्लिडिंग सुरू असताना रूग्णालयाने तनिषा यांचा साधी बीपी कंन्ट्रोलमध्ये आणण्याचासुद्धा प्रयत्न केला नाही. खरंतर अशा अनेक घटना घडतात जिथे रूग्णांना पैशांअभावी जीव गमावावा लागतो. आता अशा घटनांना आटोक्यात आणण्यासाठी रूग्णालयांमध्ये माणूसकीच्या एक विशेष कायद्याची गरज आहे की काय असा प्रश्न निर्माण होत आहे.