१४ एप्रिलला डॉ. भीमराव आंबेडकर यांची जयंती देशभरात साजरी केली जाईल. मात्र, याचदरम्यान एक मोठी बातमी समोर येत आहे. पंजाबमध्ये बाबासाहेबांच्या पुतळ्याचा अवमान करण्यात आला आहे.
26 जानेवारी रोजी पंजाबमधील अमृतसर येथे बाबासाहेब डॉ.भीमराव आंबेडकर यांच्या पुतळ्याची तोडफोड करण्यात आली होती. दरम्यान, आता तीन महिन्यांनंतर पुन्हा एकदा बाबासाहेबांच्या पुतळ्याचा अवमान झाला आहे. पंजाबमधील बटाला येथे ही घटना घडली आहे. याठकाणी काही लोकांकडून बाबासाहेबांच्या पुतळ्याची तोडफोड करण्यात आली. ज्यामुळे दलित लोकांकडून निषेध व्यक्त केला जात आहे.
बटाला येथील मियाँ मोहल्ला येथे असलेल्या पुतळ्याची सात जणांकडून तोडफोड करण्यात आली. हे सात जण कारमधून मध्यरात्री याठिकाणी आले व त्यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याची तोडफोड सुरु केली. ही घटना गुरुवारी घडली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन ताबडतोब घटनास्थळी पोहचले व याचा तपास सुरु केला.
तपासात पोलिसांनी सहा जणांना अटक केली असून, दोन वाहने देखील जप्त केली आहेत. दरम्यान, पोलीस आणखी एकाचा शोध घेत असून, लवकरच त्याला ताब्यात घेतील असं सांगितलं आहे. दरम्यान, ही कृती कोणाच्या सांगण्यावरून केली याच्यामागे हेतू काय होता? याची चौकशी पोलीस करत आहेत.