पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाच्या मुजोरपणामुळे एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला आहे. ज्यामुळे राज्यातून संताप व्यक्त केला आहे. तसेच रुग्णालयावर कारवाईची मागणी केली जात आहे. रुग्णालयाच्या बाहेर अनेकजण निदर्शने करत आहेत. या प्रकरणामुळे पुण्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत.
रूग्णालय प्रशासनाने उपचार सुरू करण्यापूर्वी गर्भवती महिलेच्या कुटुंबियांना पैशांची मागणी केली. आम्ही नंतर पैसे भरू असे, आश्वासन कुटुंबियांनी देऊनही रूग्णालयाने उपचार न केल्याने पैशांअभावी गर्भवती महिला तनिषा हीचा मृत्यू झाला ज्यामुळे पुण्यात मोठी खळबळ उडाली.
रुग्णालयातील या प्रकाराची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली असून, फडणवीस यांनी रुग्णालयातील घटनेबाबत चौकशी समिती नियुक्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ही समिती या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करणार आहे.
दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांनी देखील या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया देताना सखोल चौकशी करण्याचे आदेश दिल्याचे म्हटले आहे. ‘पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तातडीने उपचार न मिळाल्याने तनिषा भिसे या भगिनीच्या झालेल्या दुर्दैवी घटनेची गंभीर दखल शासनाने घेतली आहे. आरोग्य विभागाने तज्ज्ञ डॉक्टरांचा सहभाग असलेल्या समितीमार्फत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. मी स्वतः जिल्हाधिकाऱ्यांना ही चौकशी तातडीने, पारदर्शक आणि निष्पक्षपणे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. रुग्णालय प्रशासनाने त्यांचे म्हणणे मांडले असले तरी संबंधित सर्व घटकांचा विचार करून योग्य ती कारवाई केली जाईल. असे आश्वासन अजित पवारांनी दिले आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
तनिषा सात महिन्याची गर्भवती होती. तिला अचानक पोटात दुखू लागल्याने व मोठ्या प्रमाणात ब्लिडींग होत असल्याने ताबडतोब दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात नेण्यात आले. जेव्हा तनिषाला रुग्णालयात नेण्यात आले तेव्हा तिची परिस्थीती गंभीर झाली होती. असे असतानाही रूग्णालयाच्या प्रशासनाने २० लाख रूपये खर्च येईल असे सांगत आधी रक्कम जमा मगच उपचार सुरु होतील असे सांगितले.
कुटुंबियांनी विनंती केल्यानंतर ते १० लाखांवरती आले, पण पूर्ण पैसे भरल्याशिवाय उपचार सुरु होणार नाहीत जर तुमच्याकडे पैसे नसतील तर तुम्ही ससूनला जाऊ शकता, असे रूग्णालयाने सांगितले. कुटुंबियांनी विनंती करूनही रुग्णालयाने तनिषाला तातडीने उपचार दिले नाहीत. शेवटी तनिषाला ससूनला नेत असताना तिने दोन मुलांना जन्म दिला ज्यात तिचा मृत्यू झाला. रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे तनिषाचा मृत्यू झाल्याने कुंबासह राज्यातून संताप व्यक्त केला जात आहे.