२८ मार्च रोजी म्यानमारमध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपामुळे देशात मोठे नुकसान झाले आहे. या भूकंपात जीवितहानी तसेच वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे. म्यानमारवर ओढावलेल्या या कठीण प्रसंगात अनेक देश त्यांच्या सोबत उभे असून, मदतीचा हात पुढे करत आहेत. यात भारत देखील मागे नाही. भारताने पहिल्या दिवसापासून म्यानमारमध्ये मदत कार्य सुरु ठेवले आहे. भारत ऑपरेशन ‘ब्रह्मा’ म्यानमारला मदत करत आहे.
भारतीय लष्कराच्या फील्ड हॉस्पिटलने म्यानमारमध्ये अजूनही वैद्यकीय मदत सुरू ठेवली आहे. भारतीय लष्कराने नुकतेच प्रसिद्धीपत्रक सादर केले आहे त्यानुसार, ‘भारतीय वैद्यकीय पथकाने ३ एप्रिल संध्याकाळपर्यंत २३ शस्त्रक्रिया, १,३०० हून अधिक तपासणी आणि १०३ एक्स-रे प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडल्या आहेत.
या कठीण काळात आवश्यक वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी भारतीय वैद्यकीय पथक अहोरात्र प्रयत्न करत आहे. व म्यानमारच्या लोकांसोबत एकजुटीने उभे आहे.’ असेही प्रसिद्धीपत्रकात म्हंटले आहे.
म्यानमारच्या मंडाले विभागाचे मुख्यमंत्री म्यो आंग यांनी गुरुवारी ऑपरेशन ब्रह्मा या मानवतावादी प्रयत्नांचा भाग म्हणून स्थापन केलेल्या भारतीय लष्कराच्या फील्ड हॉस्पिटलला भेट दिली.
त्यांच्या भेटीदरम्यान, म्यो आंग यांनी सर्व दाखल रुग्णांची भेट घेतली, त्यांना आधार दिला आणि अलीकडील नैसर्गिक आपत्तीनंतर त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना झालेल्या दुखापतींबद्दल खोल दुःख व्यक्त केले.
मुख्यमंत्र्यांनी भारतीय वैद्यकीय पथकाच्या अथक सेवेबद्दल “मनापासून कृतज्ञता” व्यक्त केली आणि बाधित लोकांना चोवीस तास वैद्यकीय सेवा पुरवण्यात त्यांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेची कदर केली.
२८ मार्च रोजी म्यानमारमध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपानंतर, शोध आणि बचाव (SAR), मानवतावादी मदत, आपत्ती निवारण आणि वैद्यकीय मदत यासह आवश्यक सहाय्य प्रदान करण्यासाठी भारताने ऑपरेशन ब्रह्मा सुरू केले.