गर्भवती महिला तनिषा भिसे यांच्या मृत्यूनंतर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर टीकेची झोड उठली आहे. रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे तनिषाचा मृत्यू झाल्याने राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. कालपासून दीनानाथ मंगेशर रुग्णालया बाहेर आंदोलनं सुरु आहेत. या प्रकरणाची राज्य सरकराने देखील दखल घेतली असून, चौकशी करण्यासाठी पाच जणांची समिती गठित केली आहे.
याचदरम्यान, आता रुग्णालयाकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. रुग्णालय प्रशासनाने एक पत्रक सादर करून आजपासून रुग्णाकडून डिपॅाझिट घेतले जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे .
सात महिन्यांची गर्भवती तनिषाला अचानक रक्त स्त्राव होऊ लागल्याने दीनानाथ मंगेशर रुग्णालयात नेण्यात आले. यावेळी रुग्णालय प्रशासनाने कुटुंबियांकडून उपचाराआधी २० लाख रुपयांची मागणी केली. एकावेळी एवढी रक्कम लगेच जमा होणार नाही…तुम्हाला तुमचे सगळे पैसे मिळतील…थोडा वेळ द्या…तनिषाला आता उपचाराची गरज आहे तरी तुम्ही उपचार सुरु करा तोपर्यंत तीन लाख जमा करतो. अशी विनवणी तनिषाच्या कुटूंबाकडून करण्यात आली.
मात्र, रुग्णालय प्रशासनाने पैसे भरल्याशिवाय उपचार देणार नसल्याचे स्पष्ट केले. पैसे नसतील तर ससून रुग्णालयात जावा असं रुग्णालयातील कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आलं. शेवटी कुटूंबियांनी तनिषाला ससून रुग्णालयात नेण्याचे ठरवले. मात्र, मधेच तनिषाची प्रसूती झाली आणि यात तनिषाचा मृत्यू झाला. दीनानाथ रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे तनिषाला जीव गमवावा लागल्याने कुटुंबियांसह राज्याभरातून संताप व्यक्त केला जात आहे.
रुग्णालयावर योग्य ती कारवाई व्हावी अशी मागणी संतप्त नागरिक करत आहेत. कालपासून रुग्णालयाबाहेर नागरिक आंदोलन करत असून, तनिषासाठी न्यायाची मागणी करत आहेत .
याच पार्श्वभूमीवर रुग्णालयाच्या काल विश्वस्त मंडळाची बैठक झाली. या घडलेल्या सर्व प्रकारावर या बैठकीत चर्चा झाली. ही बैठक पार पडल्यानंतर रुग्णालयाकडून एक परिपत्रक सादर करण्यात आले. यात लिहिले आहे की, ‘लोकं कशा पद्धतीने चुकीचे वागत आहेत किंवा या विषयाला राजकीय रंग कसा येत चालला आहे हे सोडून देऊन, आपले काय चुकत आहे यावर आत्मचिंतन करण्यात आले.’
या उद्विग्न करणाऱ्या घटनेने आम्ही या विषयाचा पुन्हा आढावा घेतला. यापुढे दिनानाथ रुग्णालय इमर्जन्सीमधील कुठल्याही पेशंटकडून मग तो इमर्जन्सी रूममध्ये आलेला असो वा डिलिव्हरीच्या डिपार्टमेंटला आलेला असो वा लहान मुलांच्या विभागाला आलेला असो त्यांच्याकडून इमर्जन्सीमध्ये अनामत रक्कम घेतली जाणार नसल्याचा ठराव विश्वस्त व मॅनेजमेंट या सर्वांनी मंजूर केला आहे. असे पत्रात म्हंटले आहे.
पुढे पत्रात लिहिले आहे की, ‘जेव्हा दीनानाथ सुरू झाले तेव्हा कोणत्याही रुग्णाकडून अनामत रक्कम (डिपॉझिट) घेतली जात नसे. परंतु जसे जसे उपचार व शस्त्रक्रिया व रुग्णालयाचे नाव वाढत गेल्यामुळे येणारे गुंतागुंतीचे रुग्ण वाढत गेले. तसे तसे जास्त महागडे उपचार गरजेचे असल्यास अनामत रक्कम घेण्यास कुठेतरी सुरुवात झाली. असल्याचे स्पष्टीकरण दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आले आहे. झालेल्या घटनेतील सत्य शासकीय चौकशीद्वारे बाहेर येईलच. परंतु ह्या निमित्ताने या असंवेदनशीलतेचा अंत करण्याची आम्ही सुरुवात करीत आहोत याची सर्व बंधू-भगिनींनी व माननीय मुख्यमंत्र्यांनी नोंद घ्यावी.’