मराठी मनोरंजनसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते डॉ. विलास उजवणे यांचे निधन झाले आहे. डॉ. उजवणे यांनी वयाच्या 62 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. उजवणे यांच्या निधनाने कला विश्वावर शोककळा पसरली आहे. ४ एप्रिल २०२५ रोजी मीरारोड याठिकाणी असणाऱ्या एका खासजी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. उजवणे यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
उजवणे यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाने अमीट छाप सोडली होती. त्यांच्या साध्या सरळ अभिनय शैलीमुळे त्यांनी प्रेक्षांच्या मनावर एक वगेळी छाप सोडली होती. त्यांच्या सकारात्मक भूमिकांसह त्यांच्या खलनायकी भूमिकाही विशेष गाजल्या होत्या. चित्रपटांसह त्यांनी मराठी मालिका आणि नाटकामध्ये देखील काम केले आहे.
गेल्या काही वर्षांपासून उजवणे गंभीर आजाराचा सामना करत होते. काही वर्षांपूर्वी त्यांना ब्रेन स्ट्रोक आला होता, ज्याचा त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम झाला होता. यासोबतच त्यांना हृदयविकाराचा देखील त्रास जाणवू लागला होता. गेल्या काही दिवसांपासून ते या आजारांवर उपचार घेत होते. अचानक त्यांची तब्येत खालवल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे त्यांच्यावर उपचार सुरु होते. डॉ. विलास उजवणे यांच्या पश्चात पत्नी व मुलगा असा परिवार आहे.
दरम्यान, त्यांच्या निधनाबद्दल अनेक सहकलाकार, दिग्दर्शक आणि चाहत्यांनी शोक व्यक्त केला आहे.