वक्फ सुधारणा विधेयक लोकसभा आणि राज्यसभा अशा दोन्ही सभागृहात मंजूर करण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी हे विधेयक दोन्ही सभागृहात मांडले. दोन्ही सभागृहात विधेयक मंजूर करण्यात आले असून, आता हे विधेयक राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी पाठण्यात येणार आहे. त्यानंतर या सुधारणा विधेयकाचे कायद्यात रूपांतर होईल.
खरं देशातील अनेक भागात वक्फ बोर्डाने सरकारी आणि खाजगी जमीन वक्फ मालमत्ता म्हणून घोषित केल्यानंतर हा मुद्दा वरती आला. वक्फच्या मनमानीमुळे या कायद्यात दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली. अखेर सभागृहात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडण्यात आले आणि ते मंजूर देखील झाले.
वक्फ दुरुस्ती विधेयकावर सभागृहात चर्चा होताना अनेक गोष्टी समोर आल्या. सभागृहातील चर्चेदरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी वक्फने देशातील किती आणि कुठल्या जमीनींवर अतिक्रमण केले याची यादी वाचून दाखवली. यावेळी त्यांनी महाराष्ट्रात कुठे-कुठे वक्फने अतिक्रमण केले याबद्दल देखील सांगितले.
त्याचवेळी आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील वक्फ जमीन घोटाळा प्रकरणी मोठे पाऊल उचलत कारवाईचा इशारा दिला आहे. या प्रकरणात आम्ही काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांवर कारवाई करू, असे फडणवीस म्हणाले आहेत.
यावेळी फडणवीस म्हणाले, ‘२००० ते २०१४ दरम्यान महाराष्ट्रात झालेल्या मोठ्या वक्फ जमीन घोटाळ्यावर महाराष्ट्र सरकार लवकरच कारवाई करेल. २००० ते २०१४ या काळात वक्फच्या ताब्यात असलेल्या जमीनिंचा मोठा घोटाळा समोर आला होता. यात काँग्रेसच्या सर्व बड्या नेत्यांची त्यात नावे होती. मी विधानसभेतही हा मुद्दा मांडला होता. न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली होती. समितीने ही जमीन या नेत्यांनी बळकावल्याचा अहवाल दिला होता. आता या प्रकरणी आम्ही कारवाई करणार आहोत,” असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले आहेत.