Sanjay Gaikwad: राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत चालल्याचे दिसत आहे. त्यातच एक खळबळ उडवणारी माहिती समोर आली आहे. बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांना एका अज्ञात व्यक्तीन पत्र पाठवले आहे. या पत्राद्वारे संजय गायकवाड यांच्या मुलाच्या जीवाला धोका असल्याचा दावा करण्यात आला आहे.
संजय गायकवाड यांचा धाकटा मुलगा मृत्यूंजय गायकवाड याच्या जीवाला धोका असल्याचा पत्रात उल्लेख आहे. विशेष म्हणजे यापूर्वी दोन वेळा अशाच प्रकारचे पत्र गायकवाड यांना प्राप्त झाले आहे. आता तिसऱ्यांदा हे पत्र मिळाल्यानंतर गायकवाड यांनी याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली आहे. मात्र हे पत्र नेमके कोणी पाठवले?, हे अद्याप समोर आलेले नाही.
या पत्रात असे लिहिण्यात आले आहे की, “तुम्हाला पत्र लिहिण्याचे कारण की, तुम्हाला एक गोपनीय माहिती द्यायची आहे. तुमचे जुने सहकारी समाधान मोरे व त्यांचा भाचा रितेश खिल्लारे यांच्यामुळे तुमच्या धाकट्या मुलाला मृत्यूंजय गायकवाडच्या जीवाला धोका आहे”. तसेच मृत्यूंजय गायकवाडची हत्या करण्यासाठी सुपारी देण्यात आली असून तशी एक मिटींग पार पडली आहे, असा दावाही पत्रातून करण्यात आला आहे.
दरम्यान, पत्र लिहिणाऱ्या व्यक्तीने पत्रात असेही म्हटले आहे की, “वरील मजकूर हा खोटा नसून हा सत्य आहे. यामध्ये माझा कोणताच वैयक्तिक फायदा नसून, केवळ तुमच्या कुटुंबाप्रती काळजी आहे, म्हणून पत्राद्वारे तुम्हाला कळवत आहे. मृत्यूंजय दादांची काळजी घ्या, आई भवानी त्यांना उदंड आयुष्य लाभो हीच प्रार्थना, आपला शुभचिंतक”.