Devendra Fadnvis: शनिवारी (दि. ५ मार्च) ग्रॅव्हिटी ग्रुपतर्फे आयोजित ‘सखी गीत रामायण आणि राम सीता स्वयंवर’ या कार्यक्रमाचे गणेश कला क्रीडा मंच पुणे येथे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमात बोलताना फडणवीस म्हणाले की, “जीवनमूल्य कसे असले पाहिजे, हे प्रभू श्रीराम यांनी शिकविले. आपण त्यांना ईश्वर मानतो. ईश्वरीय शक्तीने ते रावणाला पराभूत करू शकले असते. त्या काळात रावणाची असुरी शक्ती ही विश्वातील सर्वांत मोठी शक्ती मानली जात होती. मात्र, प्रभू श्रीराम यांनी ईश्वरीय शक्तीचा वापर न करता, समाजातील सामान्यातील सामान्य लोक, नर-वानर, पशू-पक्षी यांना एकत्रित करून त्यांच्याचीस पौरूष जागृत केले आणि त्या माध्यमातून रावणाला पराभूत केले”.
“भगवान श्रीराम हे केवळ धर्म आणि मर्यादेचे प्रतीक नसून, भारताच्या सांस्कृतिक आणि नैतिक मूल्यांचे मूळ आहेत. असुरी शक्ती कितीही मोठी असली, तरीही सज्जनशक्ती एकत्रित येऊन सत्तेच्या बाजूने उभी राहिल्यास सामान्य लोकही असामान्य काम करतात. असुरी शक्तीच्या विरुद्ध लढण्यासाठी केवळ शक्तीची आवश्यकता नाही, तर सत्तेची आवश्यकता असल्याचा संदेश प्रभू श्रीराम यांनी सामान्यातील सामान्य माणसाला दिला आहे. या जीवनमूल्यानुसार जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे”, असे देखील फडणवीस कार्यक्रमादरम्यान म्हणाले.
दरम्यान, या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांसह खासदार डाॅ. मेधा कुलकर्णी, आमदार भीमराव तापकीर आणि हेमंत रासने, ग्रॅव्हिटी ग्रुपचे अध्यक्ष डाॅ. मिहिर कुलकर्णी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.