श्रीराम नवमीचं औचित्य साधून तिर्थक्षेत्र आळंदीत माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीवर शिंदेशाही उटी साकारण्यात आली. त्यामध्ये माउलींच्या डोक्यावर शिंदेशाही फेटा, अंगावर भरजरी रेशमी वस्त्र, कंबरेला आकर्षक असा पितांबर आणि चेहऱ्यावर पिळदार मिशी असा खास मराठमोळा अवतार अर्थात मराठा साम्राज्याचे महान योध्ये आणि ‘वकील-ए-मुतालिक’ महादजी शिंदे यांचं रूप साकारण्यात आलं.
पुण्यातील शिल्पकार अभिजित धोंडफळे व त्यांचे सहकारी यांनी ही शिंदेशाही उटी साकारली असल्याचे संस्थांचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी सांगितले. माऊली ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीकडून वर्षानुवर्षे चालत आलेली ही प्रथा आजही जपली जात आहे.
सोबतच राम नवमीच औचित्य साधून माऊलींच्या मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये पहाटे पवमान अभिषेक व पुजा झाल्यानंतर दुपारी १२ वाजताच्या ठोक्याला हजारो भाविकांनी पुष्पवृष्टी करत जन्मोत्सव साजरा केला.
यादरम्यान मोझे सरकार यांच्या माध्यमातून ह.भ.प. शरद महाराज बंड यांचे प्रभु श्रीरामाचा जन्मोत्सवाच्या कीर्तनाची सेवा संपन्न झाली. त्यानंतर राम जन्माचा पाळणा आणि आरती पार पडली.
यावेळी आळंदी व परिसरात विविध ठिकाणी राम जन्मोत्सव जोमात साजरा करण्यात आला.